

वाल्हे: यंदा वाढत्या उन्हामुळे शेतात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसल्याने वाल्हे व परिसरातील पशुपालकांची धावाधाव सुरू झाली आहे. जवळच्या नातेवाइकांकडे हिरवा चारा उपलब्ध होतोय का? याचा शोध अनेक जण घेताना दिसत आहेत.
मागील दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस उष्णतेची तीवता अधिक वाढत असल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. परिसरातील विहीर, बोअरवेल कोरडेठाक पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासत आहे. पाण्याअभावी जनावरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध होत नाही.
गतवर्षी ऐन मे महिन्यातच मान्सूनपूर्व पाऊस वाल्हे व परिसरात मुसळधार पडला होता. ओढे-नाले ओसंडून वाहिले होते. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत हे पाणी टिकून राहील, असा अंदाज होता. मात्र, दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावत गेली. त्यातच यावर्षी अद्याप मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात पडला नसल्याने जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली नाही.
येथील शेतकरी वर्गाने कमी पाण्याच्या उपलब्धतेवर मका, कडवळ, हत्तीघास, मेथीघास आदी पिकांची लागवड केली होती. मात्र, या पिकांसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी वर्गाची ही पिके जळून खाक होत आहेत. त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी पशुधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांची एकमेकांच्या नातेवाइकांकडे ‘चारा मिळेल का चारा?’ याबाबत शोधाशोध सुरू असल्याचे चित्र पुरंदर तालुक्यात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या आशेवर मका, कडवळ, हत्तीघास आदी चारापिकांची लागवड केली होती.
मात्र, यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने दडी मारली. त्यातच नाले, ओढे, तलाव, बंधारे, विहिरींचे पाणी आटल्याने या पिकांना पाणी देता आले नाही. परिणामी, शेतातील ही चारापिके जळून गेली. त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांची हिरव्या चाऱ्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. अनेक पशुपालक दौंड, बारामती व भोरच्या सीमेवरील काही गावांतील तसेच पुणे-सातारा जिल्ह्यातील सीमेवरील गावातील नातेवाइकांकडे चारा मिळविण्यासाठी शोधाशोध करीत आहेत. मिळेल त्या किमतीत चारा जमा करण्यासाठी त्यांनी तयारी ठेवली आहे. वाहतूक खर्च बघता पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत एक ट्रॉली चारा उपलब्ध होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.