पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वेस्थानकावरील पार्किंग क्षमतेपेक्षा जास्त भरले असताना देखील पार्किंग कंत्राटदाराने रविवारी (दि.11) अतिरिक्त गाड्या पार्क करून घेतल्या. त्यामुळे येथे अगोदरच लागलेल्या चारचाकी गाड्या अडकून पडल्या. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. पुणे रेल्वेस्थानकावर येणार्या प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सुमारे 200 रेल्वे गाड्यांची येथून ये-जा असते. त्याद्वारे लाखो प्रवासी ये-जा करतात.
त्या प्रवाशांना स्थानकावर सोडण्यासाठी आलेले त्यांचे कुटुंबीय आणि येथे दररोज आपली चारचाकी, दुचाकी पार्क करून दुसर्या शहरात कामासाठी जाणार्या प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र, रविवारी स्थानकासमोरील पार्किंग क्षमतेपेक्षा अधिक भरले असतानादेखील येथील पार्किंग कंत्राटदाराने अधिकच्या गाड्या येथे लावून घेतल्या. त्यामुळे अगोदरच येथे असलेल्या नागरिकांच्या गाड्या बराच वेळ पार्किंगमध्ये अडकून पडल्या होत्या. या वेळी वैतागलेल्या एका प्रवाशाने यासंदर्भातील व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला.
प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबाबत रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी ट्वीटरवरच दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.
हेही वाचा