पुणे

दिवाळी निमित्त एसटीच्या पुणे विभागाकडून १५०० ज्यादा गाड्या धावणार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्त मिळालेल्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणार्‍या आणि शहरात येणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीकरिता एसटीच्या पुणे विभागाकडून तब्बल 1500 ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावी आणि इतर नातेवाईकांच्या घरी फराळासाठी जाणे, ही गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली अलिखित परंपराच आहे. त्यानुसार अनेक जण सुट्टीमध्ये गावाला आणि शहरातील नातेवाईकांकडे राहते जातात. परिणामी, एसटीच्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते आणि सर्व गाड्या हाऊसफुल्ल असतात. हे लक्षात घेत, एसटीच्या पुणे विभाग प्रशासनाने नियमित 3 हजार 500 गाड्यांव्यतिरिक्त 1 हजार 500 ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एसटीच्या आगारातून प्रवाशांना दिनांक 19 ते 23 ऑगस्ट 2022 या पाच दिवसांच्या कालावधीत उपलब्ध होतील. यामुळे दिवाळी सुट्टीत प्रवाशांना यंदा तरी एसटी गाड्यांची कमतरता भासणार नाही, असे दिसत आहे.

खडकी आणि एसटी मुख्यालयातूनही गाड्या सुटणार 

शहरात स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन या तीन ठिकाणाहून एसटीच्या बस सुटतात. मात्र, अतिरिक्त 1500 बसचे दिवाळीत नियोजन असणार आहे. त्याकरिता बस पार्कींगसाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने पाच दिवसांच्या कालावधीत अतिरिक्त गाड्या पार्कींग आणि बस सोडण्यासाठी दोन नव्या जागांची व्यवस्था केली आहे. एक शंकर शेठ रस्त्यावरील एसटी पुणे विभाग मुख्यालय परिसर आणि दुसरे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी येथे ही व्यवस्था असेल, असे एसटी प्रशासनाने सांगितले.

पुण्यातून या भागात धावणार गाड्या 

मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या ठिकाणांवर जाण्यासाठी या अतिरिक्त गाड्या पुण्यातून सोडण्यात येणार आहेत. यात औरंगाबाद, नागपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला जळगाव, धुळे ,नाशिक, जालना, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड, बुलढाणा यासह अनेक ठिकाणी एसटीच्या ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत, पुणे विभागातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त 1 हजार 500 ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या गाड्या स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनसह खडकी आणि शंकरशेठ रस्त्यावरील एसटी मुख्यालय परिसरातून सुटतील, याकरिता आगाऊ आरक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.
– ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग 

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT