पुणे

शहरात काही तासांत मान्सून बरसणार; 8 जूनपर्यंत पावसाचा अंदाज

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात सोमवारी दुपारच्या वेळेस मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावल्याने किंचितसा उकाडा कमी झाला. दरम्यान, शहरात चारही बाजूंंनी बाष्पयुक्त ढगांची गर्दी झाली असून, मान्सूनचे वारे आगामी 24 ते 48 तासांत शहरात दाखल होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मागच्या वर्षी शहरात मान्सून तब्बल 15 दिवस उशिरा 25 जून रोजी दाखल झाला होता. मात्र, यंदा तो नियोजित तारखेपेक्षाही लवकर येत आहे. शहरात 8 ते 9 जून रोजी मान्सून येतो. मात्र, हवेचा दाब अनुकूल झाल्याने मान्सूनच्या वार्‍यांचा वेग राज्याच्या दिशेने वाढला आहे. त्यामुळे तो 5 किंवा 6 जून रोजी शहरात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

सोमवारी शिडकावा

सोमवारी शहरातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र या पावसाची नोंद झाली नाही. पर्वती परिसर, बाजीराव रस्ता, कोथरूड, उपनगरातील काही भागांत दुपारी दोनच्या सुमारास हलक्या सरी आल्या. तर हडपसर भागात जोर थोडा जास्त होता. तेथे रस्ते जलमय झाले होते.

शहराची आर्द्रता 40 वरून एकदम 70 टक्क्यांवर गेली आहे. याचा अर्थ असा आहे की शहरात बाष्पयुक्त वार्‍यांचा प्रभाव वाढला आहे. अरबी समुद्राकडून मान्सूनचे वारे शहरात येत आहेत. मान्सून शहरात 5 किंवा 6 जून रोजी येण्याची शक्यता आहे.

अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, पुणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT