पुणे : पुढारी वृत्तसेवा : मान्सूनची वाटचाल दुसर्या दिवशी वेगाने अरबी समुद्राच्या दिशेने सुरू झाली आहे. तो लवकरच आग्नेय अरबी समुद्रात येईल. दरम्यान, उत्तर भारताला आगामी पाच दिवस अतितीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. महाराष्ट्रात मात्र मध्यम उष्णतेची लाट अन् 26 मेपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारी मान्सूनने आग्नेय अरबी समुद्राकडे कूच करीत मालदीव, कोमोरिन, बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार बेटांत प्रगती केली. त्यामुळे दक्षिण भारतात अतिवृष्टी सुरू झाली आहे. 22 मे रोजी नैऋत्य बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. 24 रोजी त्याचे अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होत आहे. त्यामुळे मान्सून वार्यांचा वेग वाढणार आहे. दक्षिण भारतात मान्सूनचे वेगाने आगमन होताना दिसत आहे, तर उत्तर भारतात आगामी पाच दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर भारतात अतितीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने राजस्थान, पंजाब, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. आगामी पाच दिवस या राज्यांत 44 ते 47 अंशांवर कमाल तापमान जाईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सोमवारी आग्रा येथे हंगामातील सर्वोच्च 47.7 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
महाराष्ट्रात 21 ते 26 मेदरम्यान हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत पावसाचा अंदाज आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे उष्ण व दमट हवामान तयार होऊन उष्णतेची लाटही तीव्र होईल. पारा 40 ते 42 अंशांवर जाईल, असा अंदाज आहे.
उत्तर भारतात उष्णतेची लाट अतितीव्र होत आहे. यात राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशला रेड, तर मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांना उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यात आगामी पाच दिवस पाऊस राहील; पण तो हलक्या स्वरूपाचा राहणार आहे. त्यामुळे 21 ते 26 मेपर्यंत उष्ण व दमट वातावरण राहील.
– अनुपम कश्यपी,
निवृत्त शास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा
जळगाव 44.2, पुणे 38.7, अहमदनगर 39.8, कोल्हापूर 36.4, महाबळेश्वर 29.5, नाशिक 40.3, सांगली 36.8, सातारा 38.7, सोलापूर 38.2, छ. संभाजीनगर 40, धाराशिव 39.8, परभणी 39.6, नांदेड 37.2, अकोला 43.2, अमरावती 40.8, चंद्रपूर 41.2, गोंदिया 38.4, नागपूर 38.6, वाशिम 39.6, वर्धा 41.5, यवतमाळ 41.5. जळगाव 44.2 अंशांवर जळगावचा पारा रविवारी 44.2 अंशांवर गेला होता, तर सोमवारी सलग दुसर्या दिवशीही तेवढेच तापमान नोंदवले गेले. त्यापाठोपाठ अकोला 43.2, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या शहरांचे तापमान 41 अंशांवर गेले.
हेही वाचा