पुणे: पुणे, सातारा, कोल्हापूर ( घाटमाथ्यावर) आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे २१ ते २३ मे दरम्यान अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागाने रात्री दिला असून या तीनही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान केरळमध्ये साधारणतः १ जूनला पोहोचणारा नैऋत्य मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांतच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
उत्तर कर्नाटका-गोवा किनारपट्टीलगत बुधावारी रात्री कमी दाबाचा पट्टा तयार झाला. जो पुढील ४८ तासात उत्तर दिशेने सरकत जाऊन गुरुवारच्या रात्रीपर्यंत तो मजबूत होऊन तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. कोकणात (मुंबईसह) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. (Latest Pune News)
२४ मे पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा अजून तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही.दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा राज्याच्या किनारपट्टीपासून एका सुरक्षित अंतरावर राहणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे राज्याला त्याचा थेट धोका नाही.मात्र त्याच्या प्रभावामुळे २१ ते २४ मे दरम्यान अरबी समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल.