भवानीनगर: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री जय भवानीमाता पॅनेलने दणदणीत विजय मिळवल्याने काझड (ता. इंदापूर) येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये श्री जय भवानीमाता पॅनेलने पहिल्या फेरीतच मतांची आघाडी घेतली होती. पॅनेलमधील सर्वच उमेदवार मतमोजणीत आघाडीवर होते. पहिल्या फेरीमध्ये आघाडी मिळवल्यानंतरच कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. (Latest Pune News)
श्री जय भवानी माता पॅनेलला पहिल्या फेरीमध्ये आघाडी मिळू लागल्यानंतर अनेक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळच येऊन थांबले होते, परंतु दुसर्या फेरीमध्ये देखील श्री जय भवानी माता पॅनेलला आघाडी मिळत चालल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष अधिकच शिगेला पोहोचला व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी सुरू केली.
श्री जय भवानी माता पॅनेलने मतमोजणीत आघाडी मिळवल्यानंतर अजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर जोरदार जल्लोष केला. पहिल्या फेरीमध्ये उमेदवारांना आघाडी मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची पोती व फटाके आणण्यास सुरुवात केली होती. सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये डीजे लावून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जोरदार जल्लोष केला. हा जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता.