गुंड आकाश थोरात टोळीवर मोक्का; पूर्ववैमनस्यातून तरुणाचा केला होता खून File Photo
पुणे

Pune Crime: गुंड आकाश थोरात टोळीवर मोक्का; पूर्ववैमनस्यातून तरुणाचा केला होता खून

11 जणांवर कारवाई, सहा अल्पवयीन मुलांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पूर्ववैमनस्यातून तरुणावर हत्याराने वार करून त्याचा खून करून आंबेगाव परिसरात दहशत माजविणार्‍या आकाश थोरात टोळीवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

टोळीप्रमुख आकाश भरत थोरात (वय 32, रा. अटल चाळ, आंबेगाव खुर्द), अजित अंकुश धनावडे (वय 24), आदित्य जालिंदर शिंदे (वय 18), रोहित बाळासाहेब कचरे (वय 21), विशाल ऊर्फ गोड्या दीपक गणेचारी (वय 21) यांच्यासह सहा अल्पवयीन मुलांचा मोक्का कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. टोळीतील अजित धनावडे हा फरार आहे. (Latest Pune News)

याबाबत यश कांबळे (वय 23, रा. कात्रज) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे यांचे मित्र आदित्य काकडे व साहिल काकडे, सार्थक ऊर्फ ओम पंडित (वय 19, रा. अटल चाळ, कात्रज) यांचा ग्रुप आहे. सुमारे एक वर्षापूर्वी काकडे यांच्या पानटपरीवर आदित्य शिंदे हा गेला होता.

त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणातून आदित्य व साहिल काकडे यांनी आदित्य शिंदे यांना मारहाण केली होती. यश कांबळे व सार्थक पंडित हे 5 एप्रिल 2025 रोजी रात्री साडेदहा वाजता दुचाकीवरून जात असताना आकाश थोरात यांच्या साथीदारांनी दुचाकी अडवून “तुम्हाला लय मस्ती आली का, तुमचे मित्र आदित्य काकडे, साहिल काकडे यांनी आमचे मित्र आदित्य शिंदे याला मारहाण केली आहे.

आम्हाला आमच्या भाईंनी बघून घ्यायला सांगितले आहे. आम्ही तुम्हाला जिवंत सोडत नसतो,” असे म्हणून काही अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने कांबळे व सार्थक पंडित यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना सार्थक पंडित याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी अगोदर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पंडित याच्या मृत्यूनंतर त्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले होते.

दरम्यान, आकाश थोरात टोळीतील टोळीप्रमुख व टोळीतील इतर साथीदारांवर 2015 पासून एकूण 10 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आकाश थोरात याने त्याच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गुन्हेगार साथीदारांचा वापर केला आहे.

त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्या तरी त्यांच्या बेकायदेशीर कारवाया वाढत चालल्या असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे पाठविला. राजेश बनसोडे यांनी या प्रस्तावाची छाननी करून या टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त अतुल नवगिरे, राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमुले, सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे, पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे, सहायक पोलिस फौजदार चंद्रकांत माने, पोलिस हवालदार ढमढेरे, पोलिस अंमलदार अजय सावंत, आबासाहेब खाडे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT