पुणे; पुढारी वृत्तसेवा : गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते यांच्यासह त्याच्या चार साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यास मंजुरी दिली. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 42 वी कारवाई आहे.
दि. 17 जून रोजी तक्रारदार हे येथील जयभवानी चौकात घरासमोर मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना त्यांच्या ओळखीचे किरण गावडे, अविष्कार पवार व सोहम सातव यांनी तक्रारदाराला जवळ बोलवून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या वेळी फिर्यादी यांनी आरोपींचा हात वळविल्याने गोळी फिर्यादी यांच्या कमरेच्या पाठीमागील बाजूला लागली. या वेळी लोक या हल्ल्यानंतर सैरावैरा पळाले. याप्रकरणात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना अल्पवयीन मुलाकडे त्यांच्या नातेवाइकांसमोर विचारपूस केली असता हा गुन्हा पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे निष्पन्न झाले. ओंकार ऊर्फ टेड्या सातपुते, वीर फकीरा युवराज कांबळे याच सांगण्यावरून हा पूर्वनियोजित कट रचल्याचे व अल्पवयीनाचा गुन्ह्यात वापर करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीविरुध्दचा प्रस्ताव वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुील जैतापुरकर यांनी पोलिस उपायुक्त सोहेल शर्मा यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्यासमोर सादर केला होता. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे करीत आहेत.
हेही वाचा