पुणे

मोक्का 100 : पुणे पोलिसांनी फिरवले गुन्हेगारी टोळ्यांचे नंबर

Laxman Dhenge

पुणे : ड्युटी इज डेटी..! म्हणजे कर्तव्य हीच देवता आहे. असे मानून चोवीस तास पुणेकरांसाठी अलर्ट असणारे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदाचे पालन करत वर्षभर एकही सुटी न घेता ड्युटी फर्स्टचे कर्तव्य बजावले आहे. सकाळी दहाच्या ठोक्याला कार्यालयात हजर झालेले रितेशकुमार रात्री आठपर्यंत आयुक्तालयात असतात. शनिवारी 16 डिसेंबर रोजी पुण्यातील त्यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहे.

या कार्यकाळात रितेशकुमार यांनी पुणे शहर पोलिस दलात आमूलाग्र बदल केले. कामात सुसूत्रता आणून, कायदा आणि सुव्यवस्था शहराच्या स्वास्थासाठी कशी चांगली राहील याबाबत प्रयत्न केले. पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पावले उचलली. नव्याने निर्माण होणार्‍या टोळ्या आणि त्यांच्या पंटर लोकांना कारागृहाची हवा दाखवली. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत 'दामिनी पथके' सक्षम केली.

महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी 'भरोसा सेल'च्या माध्यमातून स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली. वाढती सायबर गुन्हेगारी पाहता सायबर विभागाचे विभाजन करून पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग तयार केले. गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग आढळून आल्यानंतर 'परिवर्तन'सारखा उपक्रम हाती घेऊन पाचशेपेक्षा अधिक मुले गुन्हेगारीपासून परावृत्त केली.

दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ

कोथरूडमध्ये पुणे पोलिसांनी दुचाकी चोरी 'अल सुफा' या दहशतवादी संघटनेचे फरार दहशतवादी असल्याचे समोर आले. हे दहशतवादी पुण्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत होते. मात्र, वेळीच पुणे पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या कटाचा चेहरा समोर आला. पुढे पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएस आणि एनआयएच्या पथकांनी देशभरात छापे टाकून त्यांच्या इतर साथीदारांना बेड्या ठोकल्या. मागील आठवड्यात ठाणे, पुण्यासह तब्बल 42 ठिकाणी या दोन्ही पथकांनी छापे टाकून पंधरा जणांना आयसीस मॉड्युलप्रकरणी बेड्या ठोकल्या. मागील दीड वर्षापासून एनआयएची पथके या दहशतवाद्यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांना ते मिळून आले नाहीत. यामुळे एक मोठे मॉड्युल उद्ध्वस्त करण्यात एनआयएला यश आले. हे सर्व दहशतवादी 26 अकराप्रमाणे देशात मोठे घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत होते. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहता तपास यंत्रणांना अलर्ट केले. पुढे त्यांच्या या कामाचे कौतुक एनआयएने केले.

संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा प्रभावी वापर

रितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) प्रभावी वापर करत एक वर्षाच्या कार्यकाळात तब्बल शंभर गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावला आहे. तसेच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेच्या 69 कारवाया करून राज्यातील विविध कारागृहांत त्यांची रवानगी केली आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीला लगाम लागल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रात दमदार कामगिरी

रितेशकुमार मूळचे बिहारचे. घरात पूर्वीपासूनच शैक्षणिक पार्श्वभूमी. वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता होते, तर आई विद्यापीठात बॉटनी विभागाच्या प्रमुख. तर आजी-आजोबा मुख्याध्यापक आणि शिक्षक होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. यामुळे घरात सुरुवातीपासून शिक्षणाचे वातावरण होते. त्यांची शिक्षण घेणारी ही तिसरी पिढी आहे. रितेशकुमार यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सैनिकी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतरच्या शिक्षणासाठी दिल्ली येथे गेले. ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर 1992 मध्ये पहिल्या प्रयत्नात युपीएससीची परीक्षा पास झाले. इंडियन पोलिस सर्व्हिससाठी निवड झाली आणि त्यासाठी महाराष्ट्र केडर मिळाले. महाराष्ट्रात त्यांनी विविध ठिकाणी उल्लेखनीय कर्तव्य बजावले.

प्रतिबंधात्मक फॉर्म्युला प्रभावी

गुन्हा झाल्यावर त्यावर कारवाई पोलिस करतातच. मात्र, गुन्हा होऊच नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला. 2012 पासून ज्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे त्यांचे सगळे रेकॉर्ड खंगाळून काढले. त्यानुसार 19 हजारांपेक्षा अधिक जणांवर कारवाई केली. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी चार उपक्रम हाती घेतले. फूट पेट्रोलिंग वाढवले आहे. पोलिसांचा नागरिकांसोबत संवाद वाढला. प्रत्येक पोलिस ठाण्याला मोबाईल कंट्रोल रूम तयार केली. बिट मार्शलची संख्या वाढवली. यापूर्वी 107 बिट मार्शल होते. आता यात 100 बिट मार्शलची वाढवले असून, आता एकूण 207 बिट मार्शल झाले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT