Weather Update : पुण्याला गुलाबी थंडीची साद | पुढारी

Weather Update : पुण्याला गुलाबी थंडीची साद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी येण्यास सुरुवात झाली असून, गोंदिया व पुणे या दोन्ही शहरांचे किमान तापमान शुक्रवारी 12 अंशांवर खाली आले होते. यंदाच्या हंगामातील हे निचांकी तापमान ठरले. आगामी दोन ते तीन दिवसांत राज्याचे किमान तापमान 10 अंशांखाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी शहरातील किमान तापमानाचा पारा राज्यात निचांकीच्या यादीत नोंदवला गेला. शहराचे सरासरी किमान तापमान 12.3, तर पाषाण, एनडीए, तळजाई, विद्यापीठ परिसराचा पारा 11 ते 11.6 अंशांवर खाली आला होता.

यंदा बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळांमुळे राज्यात अन् शहरात सतत ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पाऊस अन् ढग यामुळे शहरात यंदा डिसेंबरचा दुसरा आठवडा संपत आला तरी थंडी नव्हती. मात्र, गुरुवारी शहराचे किमान तापमान प्रथमच 16 वरून 14 अंशांवर खाली आले. शुक्रवारी आणखी दोन अंशांनी तापमानात घट होऊन 12.3 अंशांवर आले. राज्यात गोंदिया पाठोपाठ पुणे शहराचे तापमान निचांकी ठरले. म्हणून पाषाण, एनडीएची नोंद राज्य पातळीवर नाही शहरात बहुतांश हवामान केंद्र ही स्वयंचलित असल्याने तेथे अचूक तापमान नोंदवले जाते.

यात पाषाण व एनडीए परिसराचे तापमान 11 अंशांवर होते. असे असतानाही राज्यात पुणे सर्वांत कमी का नाही… या प्रश्नावर पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, हवामान विभागाच्या दृष्टीने शिवाजीनगर हे प्रमाण मानल्याने राज्य अन् देशासाठी तेथील तापमानाच प्रमाण मानले जाते. शहरातील वेगवेगळ्या भागात तापमान वेगवेगळे असू शकते. त्यामुळे एक प्रमाण तापमान गृहीत धरावे लागते. पुणे शहरासाठी शिवाजीनगर प्रमाण मानले आहे.

शहराचे शुक्रवारचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

पाषाण 11,एनडीए 11.6, शिवाजीनगर 12.3, चिंचवड 18.1,
मगरपट्टा 18.5, वडगाव शेरी 19.2, लवळे 17, कोरेगाव पार्क16.8.
18 डिसेंबरनंतर मोठी घट – शहराचे किमान तापमान शुक्रवारी निचांकी ठरले. आगामी तीन दिवस 12 ते 13 अंशांवर तापमान राहील. मात्र, 18 डिसेंबरनंतर त्यात घट होऊन पारा 10 अंशांखाली जाईल, असा अंदाज पुणे वेधशाळेच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला.

राज्याचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

गोंदिया 12.2, पुणे 12.3,महाबळेश्वर 12.5,नागपूर 12.8,
नगर 13.3,चंद्रपूर 13, वाशिम 13.4, सातारा 13.2, छत्रपती संभाजीनगर 13.5, जळगाव,14.3 नाशिक 14.2, सांगली 14.9, सोलापूर 16, परभणी 14.2, नांदेड 15, बीड 14.2, अकोला 15.8, अमरावती 15.1, बुलढाणा 14.2, वर्धा 14.6, यवतमाळ 13.5, कोल्हापूर 16.1, मुंंबई 22.8

उत्तर भारतातून शीतलहरी राज्यात येण्यास सुरुवात झाली आहे. काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरू असल्याने पंजाब ते मध्य प्रदेशपर्यंत थंडीची लाट आहे. त्या भागातून शीत वारे राज्यात वेगाने येत आहेत. 18 डिसेंबरपासून राज्यातील किमान तापमान 10 अंशांच्याही खाली येईल, असा अंदाज आहे.

– अनुपम कश्यपी, हवामान विभाग प्रमुख, पुणे वेधशाळा

हेही वाचा

Back to top button