Electric Shock Pudhari
पुणे

Mohammadwadi Electric Shock Death: धोकादायक डीपीचा शॉक; महंमदवाडीत ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू

महावितरणच्या निष्काळजीपणाचा आरोप; अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कोंढवा: महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील गल्ली क्रमांक ९ मध्ये रविवारी सकाळी विजेच्या डीपीचा शॉक बसल्याने हिराबाई लक्ष्मण जावीर (वय ६३) यांचा मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे या महिलेला जीव गमवावा लागल्याचा आरोप करीत संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हिराबाई जावीर ह्या सकाळी सातच्या सुमारास किराणा साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. रस्त्यालगत असलेल्या डीपीला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी बांबूच्या साहाय्याने त्यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, शनिवारी याच डीपीवर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम केले होते. तसेच, महिलेची सुटका करताना एका नागरिकालाही विजेचा सौम्य धक्का बसल्याचे सांगण्यात आले.

कृष्णानगर परिसरात बहुतांश ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या असून, गल्लोगल्ली लहान आकाराचे डीपी उभारण्यात आले आहेत. यापैकी अनेक डीपी धोकादायक अवस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेनंतर लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. संबंधित डीपीबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही महावितरणने दखल घेतली नसल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे.

हिराबाई जावीर ह्या सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणी होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जावीर कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी

शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच जावीर कुटुंबीयांची भेट घेत त्यांना तातडीची २५ हजार रुपयांची मदत केली. महावितरणने जावीर कुटुंबाला त्वरित नुकसानभरपाई द्यावी तसेच परिसरातील धोकादायक डीपी तातडीने स्थलांतरित करावेत, अशी मागणी भानगिरे यांनी केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT