पुणे: युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स विद्यापीठातून नुकत्याच पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुण दलिताला लंडनच्या हिथो विमानतळावरील नोकरीची संधी गमवावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे येथील त्याच्या पूर्वीच्या महाविद्यालयाने, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सने आवश्यक कागदपत्रे सादर करूनही त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्यास स्पष्ट नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स हँडलवर ट्विट करून केला आहे. (Latest Pune News)
ॲड. आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाने प्रेमला परदेशात शिक्षणासाठी जाताना पडताळणी करून दिली होती. मात्र, नोकरीसाठी पुन्हा पडताळणीची मागणी केल्यावर महाविद्यालय प्रशासनाने त्याला जातीविषयी प्रश्न विचारला. प्रेमचा नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून लंडनपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. दलित तरुणांनी कितीही सामाजिक-आर्थिक अडथळे पार केले, तरी व्यवस्थात्मक जातीय भेदभाव आजही त्यांचा पाठलाग करतो हे प्रेमच्या उदाहरणातून अधोरेखित होते, असे त्यांनी नमूद केले.
प्रेमवर्धन बिऱ्हाडे या विद्यार्थ्याने समाजमाध्यमांत त्याच्या आरोपांची चित्रफित प्रसारित केली आहे. त्यानुसार मॉडर्न कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात त्याने 2020 ते 2023 या काळात शिक्षण घेतले. प्रेमवर्धनला नोकरीसाठी शैक्षणिक पडताळणीची गरज होती. त्यासाठी त्याने महाविद्यालयातील विभागप्रमुख लॉली दास, उपप्राचार्य डॉ. सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला. मात्र, दास यांच्याकडून त्याला जात कोणती ते विचारण्यात आले. महाविद्यालयात येत नव्हतास, प्रामाणिक नव्हतास असे त्याला सांगण्यात आले. तसेच महाविद्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार पडताळणी करून देण्यात आली नाही. या पडताळणीपूर्वी महाविद्यालयाने त्याला संदर्भपत्र दिले होते. मात्र, आता नोकरीसाठी आवश्यक असलेली पडताळणी न झाल्याने त्याला नोकरी गमवावी लागली. महाविद्यालयात येत नव्हतो, तर विद्यापीठाच्या परीक्षेसाठी अर्ज कसा भरू दिला, या पूर्वीची संदर्भपत्रे कशी दिली? असा प्रश्न उपस्थित करत जातिभेदाचा बळी ठरल्याचा आरोप प्रेमवर्धनने केला.
प्रेमवर्धन बिऱ्हाडे या विद्यार्थ्यास तीनवेळा महाविद्यालयाकडून लेटर ऑफ रेकमेंडेशन, बोनाफाइड प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांशी संबंधित मागण्या महाविद्यालयाने यापूर्वीच पूर्ण केल्या आहेत. अलीकडेच त्याने पुन्हा महाविद्यालयात येऊन एज्युकेशन रेफरन्स माझ्या स्वाक्षरीने देण्याची मागणी केली. त्याच्या महाविद्यालयीन काळातील शिस्त, वर्तन समाधानकारक नसल्याने संस्थेच्या धोरणानुसार त्याला आणखी कोणतेही संदर्भपत्र देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर त्याने समाजमाध्यमात जातिभेदाचे खोटे आरोप प्रसारित करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयात कधीही जातीवर आधारित भेदभाव झालेला नाही. आमची संस्था सर्वसमावेशकता आणि सामाजिक न्याय मूल्यांवर कार्यरत असून, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांना समान संधी, साहाय्य उपलब्ध करून देते.डॉ. निवेदिता एकबोटे, प्राचार्या, मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय
कॉलेज प्रशासन आणि विश्वस्तांवर कारवाईची मागणी
मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक वर्तनाचा वंचित बहुजन आघाडीप्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने तीव निषेध करीत कॉलेजसमोर आंदोलन केले. या वेळी कॉलेमधील सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचे आंदोलकांनी सांगितले. प्रेम बिऱ्हाडे याला न्याय मिळावा, मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे, प्रोग््रेासिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉ. गजानन एकबोटे, प्रा. अंजली सरदेसाई, प्रा. लॉली दास यांच्यावर ॲट्रोसिटीअंतर्गत कारवाई करावी, शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्याची माहिती ‘वंचित’चे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी दिली.