पुणे; पुढारी वृत्तसेवा : येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा कैद्यांकडे दोन मोबाईल, सिम कार्ड आढळून आले आहे. मोबाईल सापडण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने येरवडा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था कूचकामी असल्याचे दिसून आले आहे. कारागृहाची सुरक्षा भेदून कैद्यांकडून मोबाईलचा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालीम आस मोहमद खान, राजू तुकाराम अस्वले, सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, आकाश उत्तम रणदिवे अशी गुन्हा दाखल केलेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे (वय 54) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेले कैदी न्यायाधीन बंदी (कच्चे कैदी) आहेत. येरवडा कारागृहात अधिकारी गस्त घालत होते. त्या वेळी तालीम खान मोबाईल वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिकार्यांनी खानची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे मोबाईल आणि बॅटरी सापडली.
6 ऑगस्ट रोजी सकाळी अधिकारी आणि कर्मचारी येरवडा कारागृहातील रुग्णालय, टिळक विभागात गस्त घालत होते. त्या वेळी काही कैदी मोबाईल वापरत असल्याची माहिती मिळाली. अधिकार्यांनी बराकीतील कैदी राजू अस्वले, सचिन घोलप, आकाश रणदिवे यांची झडती घेतली. तेव्हा अस्वलेकडे मोबाईल बॅटरी, सिम कार्ड मिळाले. दरम्यान, येरवडा कारागृहात यापूर्वी मोबाईल सापडले होते.
किरकोळ वादातून कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेची गंभीर दखल घेऊन कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी तत्कालीन अधीक्षक राणी भोसले यांची ठाणे कारागृहात बदली केली होती. त्यानंतर कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्था कूचकामी असल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा