पुणे

पिंपरी : मेट्रो विस्ताराकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेचा बहिष्कार

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो धावणार आहे. मात्र, दापोडी ते निगडी या संपूर्ण 12.50 किलोमीटर अंतरावर मेट्रो धावण्यासाठी पिंपरी ते निगडी मार्गाचा विस्तार करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची मागणी बाजूला सारून पिंपरी ते वनाज या मार्गाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे, असे पक्षाचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी शनिवारी (दि. 29) सांगितले.

शहराची मुख्य गरज असल्याने एकाच टप्प्यात दापोडी ते निगडी हा मेट्रो मार्ग पूर्ण करण्यात यावा, या मागणीसाठी मनसेने वेळोवेळी आंदोलन केले. महामेट्रो तसेच केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच, शहरातील विविध संस्था, संघटना व नागरिकांनी आंदोलन केले आहे. मात्र, त्या मागणीकडे दुर्लक्ष करीत पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे, असा आरोप चिखले यांनी केला आहे.

पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गाचे काम प्रलंबित का ठेवले आहे? केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात महामेट्रो अपयशी ठरत आहे का? पिंपरी ते निगडी मार्गासाठी आर्थिक तरतूद अपुरी आहे का? असे प्रश्न सचिन चिखले यांनी उपस्थित केले आहेत.
पिंपरी ते निगडी विस्तारित मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे. यासंदर्भातील निवेदन महामेट्रोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना शनिवारी (दि. 29) देण्यात आले आहे. या वेळी रूपेश पटेकर, दत्ता देवतरासे, सचिन शिगाडे, किरण गवळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT