पुणे: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांनीही अजित पवार यांच्यासमवेत जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी मोजक्या विश्वासू नेत्यांच्या घेतलेल्या बैठकीत काही आमदारांनी आता अजित पवार यांच्यासमवेत गेले पाहिजे, असे स्पष्ट मत मांडले. त्यावर पवार यांनी मात्र त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंध टोकाचे ताणले गेले. मात्र, आता गेल्या काही दिवसांत हे दोन्ही नेत्यांमधील संबंध सुधारल्याचे चित्र वेळोवेळी दिसून आले. नुकतेच पुण्यातील एका बैठकीत दोन्ही पवार एकत्र आले होते, त्यांच्यात वीस मिनीटे चर्चाही झाली. (Latest Pune News)
त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र, त्याबाबत ठोस पावले पडताना दिसत नव्हती. आता मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदारांनीच अजित पवार यांच्या समवेत जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. पक्षातील दहापैकी पाच आमदारांनी यासंबंधीचे स्वाक्षरीचे पत्रच पवारांना दिले आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातीलच प्रमुख आमदारांचा समावेश आहे.
दरम्यान, घडामोडी सुरू असतानाच पवार यांनी मंगळवारी मुंबईत पक्षाची आगामी दिशा ठरविण्यासाठी काही मोजक्या विश्वासू नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थित असलेल्या काही आमदारांनीही विरोधी पक्षात राहून काहीच साध्य होणार नाही. मतदारसंघातील कामे करण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे. वार्याची दिशा पाहून अजित पवार यांच्या समवेत जाण्याचा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतली. मात्र, पक्षाची आगामी भूमिका काय असेल, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
रोहित पवारही आग्रही?
पवारांनी बोलाविलेल्या बैठकीला काही मोजक्या आमदारांमध्ये आमदार रोहित पवारही उपस्थित होते. त्यांनीही आता अजित पवारांसमवेत गेले पाहिजे, अशीच भूमिका मांडल्याचे समजते. त्यामुळे आमदारांच्या भूमिकेला समर्थन मिळाले आहे.