

खटाव : खटाव बस स्थानकापासून गावात येणार्या काँक्रिट रस्त्याच्या मधोमध पाण्याच्या पाईपलाईनसाठीचा भला मोठा खड्डा खणून ठेवल्याने अडचणी निर्माण होत आहेत. वाहतुकीला अडथळे निर्माण होवून दररोज किरकोळ अपघात आणि वादावादी होत असल्याने ग्रामपंचायतीने सदर खड्डा भरुन घ्यावा, अशी मागणी होत आहे.
खटाव बाजारपेठेसह गावातील अंतर्गत तसेच रिंगरोडचे काँक्रिटीकरण झाले आहे. सर्व रस्त्यांच्या खालून जलजीवन मिशन योजनेच्या पाईपलाईनचे काम करुन ठेवण्यात आले आहे. सध्या पूर्वीच्याच पाईपलाईनने गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या पाईपलाईनचा एक व्हॉल्व बसस्थानकापासून गावात वळणार्या रस्त्याच्या मधोमध आहे. हा व्हॉल्व बर्याच वेळा बिघडतो. नवीन काँक्रिट रस्ता झाल्यावर नेहमीप्रमाणे लगेच येथील व्हॉल्व बिघडला.
दुरुस्तीसाठी काँक्रिट कापून भला मोठा खड्डा काढण्यात आला होता. बरेच दिवस तो खड्डा उघडाच ठेवण्यात आला होता. रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा असल्याने पादचारी आणि वाहन धारकांना कसरत करावी लागत होती. ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने बरेच दिवस हा खड्डा तसाच होता. गावातीलच एक व्यक्ती तोल जाऊन त्या खड्ड्यात पडून जखमी झाल्यावर ग्रामपंचायतीने उशीरा तत्परता दाखवून मातीने हा खड्डा अर्धवट भरुन घेतला होता. बरेच दिवस झाल्याने या खड्ड्यातील माती निघून गेल्याने पुन्हा खोलगट खड्डा तयार झाला आहे.
रस्त्याच्या मधोमध हा खड्डा असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. याच परिसरात बस स्थानक, बँक, मेडिकल, पोस्ट ऑफिस, हॉटेल्स आणि अनेक दुकाने असल्याने हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. नेमका याच भागात रस्त्याच्या मधोमध असणारा खड्डा चुकवताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. खड्ड्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाहने नेताना एकमेकांना घासून वादाचे प्रसंग घडत आहेत.
दुचाकीस्वार या खड्ड्याला चांगलेच धास्तावले आहेत. दुचाकी खड्ड्यात आपटून मागील व्यक्ती पडून होणारे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने हा खड्डा त्वरित भरुन घ्यावा, अशी मागणी होत आहे.
चक्क दीड फुटाचे काँक्रिट रात्रभर कटरने कापून हा खड्डा खोदण्यात आला होता. काँक्रिटच्या खाली आणखी चार ते पाच फुटांचा खोल खड्डा अगोदर बरेच दिवस उघडा ठेवण्यात आला होता. एकजण त्यात पडल्यावर खड्डा तात्पुरता मुजवण्यात आला होता. आता पुन्हा सर्व वाहने धडाधड आपटण्याइतपत खोल खड्डा कित्येक दिवस झाले तयार झाला आहे. देखण्या काँक्रिट रस्त्यावर आणि गावात प्रवेश करतानाच या खड्ड्याने स्वागत होत असल्याने गावकरी वैतागले आहेत.