पुणे : कोविड या संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिला आणि अनाथ बालकांसाठी राज्य शासनाच्या वतीने ’मिशन वात्सल्य’ योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.(Latest Pune News)
कोविड या संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन तसेच त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने विधवा महिला, अनाथ बालके यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ संबंधितांना उपलब्ध करून देण्यासाठी ’शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचीच पुढील अद्ययावत योजना म्हणजे ’मिशन वात्सल्य’ ही योजना आहे.
मिशन वात्सल्य या योजनेच्या माध्यमातून विधवा महिला, अनाथ बालक आणि परित्यक्ता महिला यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेची व्याप्ती अजून वाढविण्यात येणार आहे, असा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे.
मिशन वात्सल्य ही भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाची योजना आहे. याअंतर्गत बालसंरक्षण प्रणाली मजबूत करण्याचा उद्देश आहे. केंद्राच्या सहभागातून राज्य शासनाने महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राज्यात ही योजना राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, कोविड या आजारानंतर विधवा महिलांना लाभ मिळावा, यासाठी त्यांना देखील या योजनेत समावेश करण्यात आला.
बालगृहे, अनाथ, निराधार किंवा अत्याचारग्रस्त मुलांसाठी, बालकांसाठी तात्पुरती आणि दीर्घकालीन देखभाल, पालकत्व दत्तक योजना बाल अधिकारांचे संरक्षण : बालकल्याण समित्यांची स्थापना, सक्षमीकरण, पुनर्वसन आणि पुनःएकत्रीकरण करणे.