Pune Rain: ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पावसाने झोडपले, भातपिकाचे मोठे नुकसान

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कडू
Pune Rain News
ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पावसाने झोडपले, भातपिकाचे मोठे नुकसान
Published on
Updated on

खडकवासला : सिंहगड, पानशेत-वरसगाव खोऱ्याला लक्ष्मीपुजनाच्या दिवशी मंगळवारी (दि. २१) जोरदार अवकाळी पावसाने झोडपले. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या, तसेच कापणी केलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे.

Pune Rain News
Unseasonal rain impact : परतीच्या पावसाने बळीराजाची दिवाळी पहाट शेतात

या परिसरात मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी एक वाजता जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. खडकवासला धरण खोऱ्यातील गोऱ्हे, डोणजे, खानापूर, मांडवीसह सिंहगड किल्ल्याच्या परिसरात तसेच वरदाडे मालखेड, निगडे मोसे, ओसाडे, सोनापुर, रुळे कुरण, पानशेत वरसगाव परिसराला पावसाने झोडपले. सायंकाळी उशिरापर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. खानापूर (ता. हवेली) येथील शेतकरी श्रीकांत जावळकर यांच्यासह मुरलीधर जावळकर, माऊली वाघ आदी शेतकऱ्यांची उभे भात पीक जमीनदोस्त झाले. श्रीकांत जावळकर म्हणाले, वर्षभर केलेले काबाडकष्ट एका पावसाने मातीमोल केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पानशेत जवळील कुरण बुद्रुक (ता. राजगड) येथील रविंद्र कडू, बबन कुंभार, ज्ञानोबा ढमाले, प्रताप तुकाराम कडू, अशोक कडू आदी शेतकऱ्यांचे कापणीस आलेली तसेच अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भात पिकात पाणी शिरुन नुकसान झाले आहे. अशीच गंभीर स्थिती रुळे, सोनापूर, कुरण खुर्द, कादवे, वरसगाव , निगडे मोसे, ओसाडे आदी ठिकाणी आहे. निगडे मोसे (ता. राजगड) येथे भिकोबा पासलकर यांच्या कापणी केलेले भात पीक भिजून वाया गेले. रविंद्र कडू म्हणाले, अचानक पडलेल्या पावसामुळे खाचरात कापणी करून उन्हात वाळण्यासाठी ठेवलेली भात पीक पाण्यात बुडाली आहेत. तर उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत.

नुकसान भरपाई द्यावी

कापणी केलेले व जमीनदोस्त झालेली भात पिकांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अद्यापही पाऊस पडत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी केली.

29 ऑक्टोबरपर्यंत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता

पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी काही भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडला. दरम्यान, शहर आणि परिसरात 29 ऑक्टोबरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान शहरातील हडपसर, मुंढवा या भागात पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून शहराचे कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढल्यामुळे दिवसभर चांगलाच उकडा वाढला होता. तर रात्रीपासून पहाटेपर्यत थंडी जाणवत आहे. मात्र, ऑक्टोबर हिट आणि दक्षिण भारतात सुरू असलेल्या पावसामुळे पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी भात पिकांची कापणी करू नये. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यात येणार आहे.
सुनील ईडोळे पाटील, कृषी अधिकारी, राजगड
Pune Rain News
Heavy Rains Agriculture Damage : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, मदत मिळणार कधी ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news