पुणे: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्ष्यवेध’ कुस्ती निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र योजनेवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने गंभीर आक्षेप घेतले आहेत. ही योजना चुकीच्या पद्धतीने आणि कुस्तीगीर संघाला विश्वासात न घेता राबविली जात असल्याचा आरोप करीत संघाने 6 एप्रिल रोजी राज्यव्यापी ‘थाळीनाद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी क्रीडा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात योजनेतील अनेक त्रुटी मांडल्या आहेत. शासनाच्या नियोजनानुसार 10 वजनी गटांत केवळ 20 कुस्तीगीर निवडले जाणार आहेत.
मात्र, कुस्तीमध्ये सरावासाठी जोडीदाराची आवश्यकता असते. दुखापतींमुळे 15-20 टक्के खेळाडू विश्रांतीवर असतात. अशा वेळी मोजक्या खेळाडूंमुळे सराव करणे अशक्य होईल. यामुळे दर्जेदार कुस्तीगीर या योजनेत सहभागी होणार नाहीत आणि केवळ कागदोपत्री अंमलबजावणी होऊन शासनाच्या पैशाचा अपहार होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
ही योजना केवळ ‘फ्री-स्टाईल’ कुस्तीसाठी मर्यादित असून, ग््राीको-रोमन आणि महिला कुस्तीगिरांबाबत यात स्पष्टता नाही. प्रशिक्षक आणि आहाराचा दर्जा काय असेल, याबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आंदोलनाचा पवित्रा
‘शासनाने या योजनेचे सध्याचे नियोजन त्वरित स्थगित करून कुस्तीगीर संघासोबत चर्चा करावी,’ अशी मागणी भोंडवे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास 6 एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा कार्यालयांसमोर थाळीनाद आंदोलन केले जाईल आणि क्रीडामंत्री व क्रीडा आयुक्तांचा निषेध केला जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.