Millions of swear words in the 'Zoom' category 
पुणे

‘झूम’च्या वर्गात शिव्यांची लाखोली

backup backup

पिंपरी : संतोष शिंदे : 'झूम' अ‍ॅपद्वारे सुरू असलेल्या ऑनलाईन वर्गात शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अज्ञातांकडून शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे.

हे प्रकार वारंवार घडू लागल्याने पिंपरी चिंचवड शहरातील शाळांनी आता पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवण्यास सरुवात केली आहे. आतापर्यंत सायबर सेलकडे एकूण 14 तक्रारी आल्याची नोंद आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी 'झूम' सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅपचा सर्रास वापर केला जात आहे.

ऑनलाईन वर्ग सुरू होण्यापूर्वी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुप वर लिंक पाठवली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाइन क्लासमध्ये आपोआप जॉईन होता येते.

बहुतांश शिक्षक यासाठी कोणताही पासवर्ड वापरत नाहीत. काही खोडसाळ विद्यार्थी जाणीवपूर्वक ही लिंक बाहेर व्हायरल करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांव्यतिरिक्त काही समाजकंटकदेखील ऑनलाइन वर्गात प्रवेश घेतात.

विद्यार्थी संख्या मोठी असल्याने अनेक शिक्षकांना विद्यार्थ्यांव्यतिरिक्त जॉईन झालेले 'टगे' लक्षात येत नाहीत. याचाच फायदा घेऊन शिक्षक महत्त्वाच्या विषयांवर शिकवत असताना जॉईन झालेली टगे अश्लील भाषेतल्या शिव्यांचे मेसेज फ्लॅश करतात.

मेसेज सेंड करण्यापूर्वी ते सेटिंगमध्ये जाऊन 'EVERYONE' हा पर्याय वापरतात. त्यामुळे क्लास सुरू असताना सर्वांच्या स्क्रीनवर अश्लील शिव्यांचे मेसेज दिसतात.

अचानक स्क्रीन आलेल्या घाणेरड्या शिव्यांमुळे ऑनलाईन वर्गातील मुलं-मुली खजील होतात. तसेच, शिक्षकांनादेखील या लाजिरवाण्या प्रकारामुळे मान खाली घालावी लागते. यातील कळस म्हणजे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मोठ्याने ओरडून शिव्यादेखील देतात.

वर्ग शांततेत सुरू असल्याचे पाहून मुलीचे नाव घेऊन शिव्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारांमुळे ऑनलाईन वर्ग विस्कळीत होऊन शेवटी बंद पडत आहेत. या वाढत्या प्रकारामुळे ऑनलाईन वर्ग शिक्षकांची डोकेदुखी ठरू लागली आहे.

फ्री अ‍ॅपमुळे तपासात अडचणी

बहुतांश शाळा ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी 'झूम' कंपनीचे फ्री अ‍ॅप वापरतात. तत्सम कंपन्या फ्री अ‍ॅपवरील मिटिंग्सचा डेटा स्टोअर करून ठेवत नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

त्यामुळे मिटिंग अथवा ऑनलाईन क्लासच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचे अ‍ॅप डेव्हलप करावे. ते शक्य नसल्यास थर्ड पार्टी अ‍ॅपची पेड सर्व्हिस घ्यावी, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

  • 14 शाळांची पोलिसांत धाव
  • स्थानिक पोलिसही चक्रावले
  • सायबर सेलकडून तांत्रिक तपास सुरू

अशी घ्यावी काळजी

  • झूम सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅपची फ्री सर्विस वापरू नये
  • शाळेने स्वतःचे सुरक्षित अ‍ॅप/वेबसाईट डेव्हलप करावी
  • प्रत्येक क्लाससाठी एक्सेस कंट्रोल पॉलिसी असावी
  • ऑनलाइन क्लासमध्ये इतर शिक्षक-पालक किंवा अनोळखी व्यक्ती येणार नाहीत यासाठी धोरण ठरवावे
  • ऑनलाइन क्लासचे रेकॉर्डिंग जपून ठेवावे
  • ऑनलाइन क्लास घेण्यासाठी सायबर सिक्युरिटीचे ट्रेनिंग घेतलेल्या व्यक्तीची नियुक्ती करावी
  • ऑनलाइन क्लाससाठी एक्सेस 2 फॅक्टर, 3 फॅक्टर परवानगीचा वापर करावा
  • क्लासमध्ये हजर-गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद घ्यावी
  • प्रत्येक ऑनलाईन क्लाससाठी होस्ट, अ‍ॅडमिन, टेक्निशियन यांची नेमणूक करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी
  • प्रत्येक विद्यार्थी ऑफलाईन शाळेमध्ये सुरक्षित राहण्यासाठी शाळांनी ऑनलाईन क्लाससाठी स्वतंत्र बजेट ठेवून स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे.

"ऑफलाइन शाळेत ज्याप्रमाणे विद्यार्थी, शिक्षक यांच्या सुरक्षिततेची काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाते. त्याचप्रमाणे ऑनलाईन शाळेतही सुरक्षेची सर्व जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची आहे. यासाठी शाळांनी ऑनलाईन क्लास पॉलिसी तयार करून ती संबंधित शासकीय अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेणे अपेक्षित आहे."
– डॉ. संजय तुंगार, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT