पुणे : राजा बहादूर मिल्समधील हॉटेल 'मिलर्स' लक्झरी क्लबवर (पब) अखेर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परवानगीपेक्षा जास्त वेळ पब सुरू ठेवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असला, तरी रात्री दीडनंतर पबमध्ये सीसीटीव्ही बंद केले होते. त्यामुळे त्या रात्री तिथे पार्टी झाली की नाही? याचा शोध अद्याप लागलेला नाही.
मिलर्स मालक गिरीश कचोरिया असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई अमित एकनाथ बधे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.9) रात्री मिलर्समध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी रंगल्याची चर्चा होती. त्यातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी पबमध्ये जाऊन सीसीटीव्ही तपासणी केली. मात्र त्यावेळी रात्री दीडनंतर पबमधील सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे मिलर्समध्ये प्रत्यक्षात काय सुरू होते, याबाबत संशय गडद झाला.
दुसर्या दिवशी पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणीसह तीन जणांचे जबाब नोंदविले. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे. कचोरिया यांनी त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये शासनाने दिलेल्या मुदतीनंतरही व्यवसाय सुरू ठेवला. तसेच वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बंडगार्डन पोलिस पुढील तपास करीत आहेत.
मिलर्समधील सीसीटीव्ही रात्री दीडनंतर बंद केले होते. त्यावेळी तिथे काही जण होते. त्यामुळे त्या रात्री तिथे पार्टी झाली की नाही? हे स्पष्ट होऊ शकले नाही. यावर आता पोलिस कसा तपास करतात, हे पाहावे लागणार आहे. इतर पबमध्ये देखील असेच प्रकार सुरू आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
राजा बहाद्दुर मिल परिसरात असलेल्या पबमध्ये सातत्याने पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे प्रकार घडत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच येथील एका पबमध्ये फ्रेशर्स पार्टी झाली. त्यानंतर आता मिलर्समध्ये चक्क सीसीटीव्ही बंद ठेवून पब उशिरापर्यंत सुरू ठेवल्याची माहिती आहे. दरम्यान, सातत्याने घडणारे हे प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येत नाहीत. स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.