पुणे: देशाच्या कानाकोपर्यांतून आलेले ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे संचालक मंडळ मागील तीन दिवसांपासून पुणेमुक्कामी आहे. दरवर्षीप्रमाणे 6 जून रोजी मंडळाची बैठक सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी ती वादळी ठरली.
सचिवपदावरून हकालपट्टी झालेले मिलिंद देशमुख या बैठकीत आले आणि त्यांनी जुन्या थाटात आर्थिक समितीतील सदस्यांशी वाद घातला. ते थेट सदस्यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे संचालक मंडळ ही बैठक अर्धवट सोडून निघून गेले. (Latest Pune News)
‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’ संस्थेतील वाद अजूनही निवळलेले नाहीत. दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक यावर्षी 6 ते 14 जून या कालावधीत होती. यात प्रामुख्याने 31 ऑगस्टपर्यंत संस्थेचा आर्थिक-प्रशासकीय लेखाजोखा धर्मादाय आयुक्त आणि प्राप्तिकर विभागाला सादर करावा लागतो. हा विषय केंद्रस्थानी ठेवून ही बैठक यंदाही आयोजित केली होती. मात्र, मिलिंद देशमुखांनी या बैठकीत
...भ्रष्टाचाराचा अहवाल येताच चवताळले देशमुख
एप्रिल महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ‘जूनमध्ये भेटू’ असे आश्वासन देत सर्व संचालक आपापल्या गावी निघून गेले. तेव्हापासून संस्थेतील वातावरण अस्थिर आहे. दि. 6 जून रोजी शुक्रवारी सर्व संचालक पुणेमुक्कामी आले. मात्र शनिवारी (दि. 7) झालेल्या पहिल्याच बैठकीत मिलिंद देशमुख सचिव असल्याच्या भ्रमातच संस्थेत आले.
या वेळी त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा एक अहवाल सादर केला जात होता. ते पाहून देशमुख यांचा तोल ढासळला आणि त्यांनी बैठकीतच गोंधळ घातला तसेच त्यांनी गोखले इन्स्टिट्यूटचे प्रभारी कुलगुरू प्रा. शंकर दास यांच्या काही निर्णयांबद्दल आक्षेप घेतले. या वेळी देशमुख यांचा मुलगा चिन्मय हादेखील घटनाबाह्य पद्धतीने संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित असल्याचा आरोप होत आहे.
संस्थेची प्रतिष्ठा राखण्यासाठी पोलिसांत तक्रार नाही
बैठकीत देशमुख यांनी संचालक रमाकांत लेंका यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हे भांडण इतके विकोपाला गेले की आता धक्काबुक्की होते की काय! असे वाटत होते. त्यामुळे व्यथित होऊन उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा हे बैठकीतून बाहेर पडले. देशमुख यांना अटी व शर्तींवर जामीन मिळाला असून, ते त्याचे पालन करीत नसल्याने पोलिसांत तक्रार करावी का? यावरही चर्चा झाली. मात्र, संस्थेची प्रतिष्ठा राखली जावी म्हणून तसे न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्ष साहू खरेच आजारी आहेत का?
या बैठकीसाठी देशाच्या विविध भागांतून संचालक पुण्यात मुक्कामी आहेत. अध्यक्ष साहू, उपाध्यक्ष मिश्रा यांच्यासह रमाकांत लेंका, गंगाधर साहू, दिनेश मिश्रा, अमरीश तिवारी, पी. के. द्विवेदी हे सर्वजण 6 जून रोजीच पुण्यात दाखल झाले.
मात्र, आजारी असल्याने बैठकीला येता येणार नसल्याचे साहू यांनी कळविले. त्यामुळे साहू खरेच आजारी आहेत की त्यांना देशमुखांनी आजारी पडण्यास भाग पाडले, अशी दबक्या आवाजात बैठकीत चर्चा सुरू होती. साहू यांनी उपस्थितीबाबत कळविले. मात्र, मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत 7 जून रोजी बैठक सुरू करण्याबाबतचे पत्र न दिल्याने बैठक झालीच नाही.
माजी आमदार संजय जगतापांसोबत देशमुखांचे गुफ्तगू
तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आर्थिक समितीचे सदस्य उपस्थित होते. अचानक देशमुखांनी गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रकरणावर पडदा टाकण्याच्या प्रयत्न केला. तसेच आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून संचालक मंडळावर दबाव आणण्याच्या प्रयत्न केला आणि रमाकांत लेंका यांच्या अंगावर धावून गेले.
यानंतर देशमुख प्रभारी कुलगुरू प्रा. शंकर दास यांच्याविरोधात शहरातील काही राजकीय लोकांना घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, रविवारच्या सुटीमुळे डॉ. दास उपस्थित नसल्याने हा डाव फसला. माजी आमदार संजय जगताप या वेळी देशमुख यांच्यासोबत कौन्सिल हॉलमध्ये गुफ्तगू करीत असल्याचे दिसून आले.झाला प्रकार खूप गंभीर आहे.
मी वाराणसीहून 48 तासांचा प्रवास करून पुण्यात आलो. अध्यक्ष साहू आजारी असल्याने माझ्या उपस्थितीत बैठक सुरू झाली. मात्र, त्यात मिलिंद देशमुख खूप आक्रमक झाले. काही संचालकांशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मला वाटले आता मारामारी होते की काय! त्यामुळे मी त्या बैठकीतून दुःखी मनाने उठून आलो. देशमुख यांनी सायंकाळी येऊन माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण, मी झाल्या प्रकाराने व्यथित झालो आहे. पुढची मीटिंग कधी घ्यायची? यावर अध्यक्षांकडून निरोपाची वाट पाहत आहे.- आत्मानंद मिश्रा, उपाध्यक्ष, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी