खडकवासला: सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटी गेटजवळील पेट्रोल पंपासमोर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत अहे.
अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे या पाण्यात भर पडत आहे. महापालिकेकडून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, येथील परिस्थिती पाहिल्यानंतर प्रशासनाचा हा दाव फोल असल्याचे स्पष्ट होत आहे.(Latest Pune News)
गेल्या आठ- दहा दिवसांपासून या परिसरात पाऊस पडत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. नांदेड सिटी गेट जवळील पेट्रोल पंपासमोर ओढ्याचे पात्र बुजवून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण करण्यात आले आहे.
त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच शिल्लक नाही. कमी पावसातही या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. या पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
या ठिकाणी साचलेल्या पाण्यातुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच दुचाकी आणि रिक्षा बंद पडत आहेत. दुचाकीस्वार घसरून अपघातदेखील होत आहेत. महापालिकेकडून पावसाळापूर्व कामे करून पाण्याचा निचरा होण्याची उपाययोजना करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
मात्र, या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून निचरा होत नसल्याने पाणी साचून आहे. यामुळे प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासन उपाययोजना केल्याचे सांगत आहे, मग या ठिकाणी पाणी का साचले, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पर्यटकांचीही होतेय गैरसोय
नांदेड सिटी गेटजवळ सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पर्यटकांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दुसरीकडे सुस्तावलेल्या प्रशासनामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही सिंहगड रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारे नसल्याने, तसेच नैसर्गिक ओढे आणि नाल्यांचे प्रवाह बुजवून अतिक्रमणे केली आहेत, यामुळे ठिकठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबत आहे.
पावसामुळे नांदेड सिटी गेटजवळ सिंहगड रस्त्यावर नेहमीच पाणी साचत आहे. या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच उरला नाही. तसेच हा भाग खोलगट भाग असल्याने रस्ता पाण्याखाली गेला आहे. ओढ्याचे नैसर्गिक पात्र मोकळे करून महापालिका प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- इंद्रजित दळवी, कार्याध्यक्ष, सिंहगड परिसर विकास समिती
या ठिकाणी साचणार्या पाण्याबाबत संबंधित विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोरदार पावसात या ठिकाणी गंभीर पूरस्थिती निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे.
- तिमया जगले, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय