पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4 हजार 186 सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.(Latest Pune News)
सुधारित वेळापत्रकानुसार पुणे मंडळातर्फे सदनिका वितरणासाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता 11 डिसेंबर, रोजी दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे.
पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली असून, यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 1683 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत 299 सदनिका, 15 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील 864 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3222 सदनिकांचा समावेश आहे.
मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी संगितले की, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व इतर कारणास्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात आली. यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी. अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेकरिता मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेबाबत मदतीसाठी 022-69468100 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन साकोरे यांनी केले आहे.
म्हाडाने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील 1 हजार 300 शिल्लक राहिलेली घरेही या सोडतीत समाविष्ट केली आहेत. या सोडतीत आतापर्यंत 62 हजार 11 अर्ज आले असून, 35 हजार 913 जणांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यानुसार आतापर्यंत 62 कोटी 25 लाख 28 हजार 584 रुपयांची अनामत रक्कम जमा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.