पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४ हजार ४६२ सदनिकांच्या सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार आता २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने सोडतीचे संपूर्ण वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
विजेत्या अर्जदारांची नावे त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. पुणे मंडळातर्फे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांतील सदनिकांच्या वितरणासाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार ऑनलाइन अर्जासाठी सुरुवातीला १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र, अनेक अर्जदारांना कागदपत्रांच्या ऑनलाइन पडताळणी मध्ये अडचणी येत असल्याने अर्जाची मुदत एका महिन्याने वाढवून १५ ऑक्टोबर करण्यात आली आहे. अर्जदारांना आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ या दोन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला अथवा प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची मुभा यापूर्वीच देण्यात आली आहे.
असे आहे सुधारित वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अनामत रक्कम त्याच दिवशी रात्री ११:५९ वाजेपर्यंत, तर आरटीजीएस अथवा एनईएफटीद्वारे १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत भरता येईल. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध होईल.
त्यावर १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दावे-हरकती नोंदवता येणार आहेत. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर केली जाईल. सदनिकांची सोडत २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार असून, विजेत्या अर्जदारांची नावे त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जातील.