Paper leak 
पुणे

म्हाडा पेपरफुटी प्रकरण : उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा सल्ला

अमृता चौगुले
  • एका परीक्षार्थीमागे ठरले होते दहा लाख

  • ओएमआर शीटमध्ये फेरफार करणार होता डॉ. देशमुख

पुणे : पुढारी वृत्तसेवा : म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याने पेपरच्या मोबदल्यात एजंटांकडून एका विद्यार्थ्यामागे दहा लाख रुपये लाटण्याचा डाव रचला होता. त्यासाठी त्याने एक सूत्रबद्ध योजना आखल्याचे आणि पैसे देणार्‍या परीक्षार्थींना उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा सल्ला देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

पेपरफुटीचे हे लोण संपूर्ण राज्यभर पसरल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील दहा एजंट पोलिसांच्या रडावर आले आहेत. उत्तरपत्रिका तपासण्याच्या वेळी एजंटमार्फत आलेल्या परिक्षार्थीच्या ओएमआर शीटमध्ये (उत्तरपत्रिका) देशमुख गुण भरून फेरफार करणार होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पुण्यातील जी. सॉफ्टवेअरचा संचालक असलेल्या डॉ. देशमुख याचेसह अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली. तिघांना 18 पर्यंत
पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने रविवारी (दि.13) दिल्यानंतर त्यांच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.

देशमुखच्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीला म्हाडाची लेखी परीक्षा आयोजित करून निकालापर्यंतचे सर्व कामाचे कंत्राट देण्यात आले होते. त्याच संधीचा फायदा घेत देशमुख याने राज्यभर पसरलेल्या आपल्या एजंट टोळीकडून परीक्षार्थी हेरण्यास सुरुवात केली. देशमुख याने पेपर देण्याच्या बदल्यात एजंटाकडे एका परीक्षार्थीमागे दहा लाखांचा रेट ठरवला. मग एजंट संबंधित परीक्षार्थीकडून किती पैसे घेणार, हे त्या एजंटवर अवलंबून होते. दहा लाखांच्या मोबदल्यात देशमुखने ठरलेल्या परीक्षार्थींना ओएमआर शीट (उत्तरपत्रिका) कोरी ठेवण्यास सांगितले होते.

परीक्षार्थी मिळालेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन केवळ त्याची संपूर्ण माहिती त्या उत्तरपत्रिकेवर भरणार होता. तसेच त्या उत्तरपत्रिका कोर्‍या ठेवण्याचे ठरले होते. पुढे या सर्व उत्तरपत्रिका देशमुख काम करीत असलेल्या कंपनीच्या ताब्यात येणार होत्या. उत्तरपत्रिका तपासण्याच्या वेळी एजंटमार्फत आलेल्या परीक्षार्थींच्या ओएमआर शीटमध्ये देशमुख गुण भरून फेरफार करणार होता. मात्र, ऐनवेळी पुणे पोलिसांना माहिती मिळाली आणि देशमुखचा डाव फसला.

सावज हेरणारे एजंट रडारवर

डॉ. देशमुखने म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणात राज्यभरातील अनेक एजंटांशी संपर्क केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पुणे सायबर पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे उद्ध्वस्त करण्यासाठी एजंटची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पोलिसांना राज्यातील दहा एजंटची माहिती मिळाली आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ते किती विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते ते स्पष्ट होणार आहे.

4 पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल जप्त

सायबर पोलिसांनी डॉ. देशमुख याच्या खराळवाडी येथील घराची सोमवारी रात्री झडती घेतली. त्यात पोलिसांना 4 पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल सापडला आहे. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले असून या वस्तूंचा पंचनामा करून पंचांसमोर री- ओपन करून पाहिल्यानंतर त्यामध्ये नक्की काय आहे, हे समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

सराइतांचा रिव्हिजन अर्ज फेटाळला

महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील अंकुश रामभाऊ हरकळ (वय 44, रा. किनगावराजा, ता. सिंदखेडराजा, बुलडाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (वय 42, रा. चिखलठाणा, औरंगाबाद) यांनी पोलिस कोठडी रद्द करण्यासाठी केलेला रिव्हिजन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात पोलिस कोठडी रद्द करावी, यासाठी आरोपींनी न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. त्याला सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. 'रिव्हिजन'ची व्याप्ती त्रोटक आहे, अर्जदार आरोपींकडून आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींच्या दोन याद्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यावरून आरोपी सराईत पेपर फोडणारे असल्याचे दिसून येत आहे. या गुन्ह्याचा हेतू, कटात अन्य व्यक्तींचा सहभाग उघड करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील बोंबटकर यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा 'रिव्हिजन' अर्ज फेटाळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT