पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) आगामी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला सुरुवात येत्या आठवडाभरात करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. प्रवेश परीक्षांच्या संकेतस्थळाच्या चाचण्या सुरू असून, त्या पूर्ण होताच नोंदणीला सुरुवात केली जाणार असल्याचे सीईटीसेलमधील अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.
सीईटी सेलने यंदा बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये यंदापासून इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी, तसेच एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा दोनदा घेतली जाणार आहे. त्यांचे नियोजन सीईटी सेलने सुरू केले असून, त्याचे संभावित वेळापत्रक जाहीर केले आहे.
सीईटी परीक्षा वेळेत होऊन प्रवेश प्रक्रियाही वेळेवर पार पाडण्याचा सीईटी सेलचा प्रयत्न आहे. त्यानुसार आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. त्यादृष्टीने सीईटी सेलचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सीईटी सेलमार्फत यंदा २४ मार्चपासून सामायिक प्रवेश परीक्षांना सुरुवात केली जाणार आहे. सध्या एकूण १७ प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात पदवी अभ्यासक्रमाच्या १२ प्रवेश परीक्षा, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ५ प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. यातील बहुतांश प्रवेश परीक्षा सकाळी व दुपारच्या सत्रात ऑनलाइन घेतल्या जातील. तर काही प्रवेश परीक्षा सायंकाळच्या सत्रात देखील होतील.
- सीईटी सेल यंदा एमबीए / एमएमएस परीक्षा ६ एप्रिल ते ८ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा ९ मे रोजी घेणार आहे.
- इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटीची पहिली प्रवेश परीक्षा ११ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा १४ मे ते १७ मेदरम्यान घेतली जाणार आहे.
- कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी पहिली प्रवेश परीक्षा २१ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान तर दुसरी प्रवेश परीक्षा १० मे व ११ मे रोजी घेतली जाणार आहे.