मंचर :पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक मंदावल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि.2) मेथीची एक जुडी 50 तर कोथिंबिरीची जुडी 42 रुपयांना विकली गेली. या मोसमात पालेभाज्यांना मिळालेला हा उच्चांकी दर असल्याचे सभापती नीलेश थोरात यांनी सांगितले.(Latest Pune News)
सततच्या पावसामुळे मेथी, कोथिंबीरचे नुकसान झाले आहे. पिकाची प्रतवारी ढासळली आहे. भिजलेली मेथी, कोथिंबीर यांना फारशी मागणी नसते. मंचर बाजार समितीमध्ये मेथी, कोथिंबीर, शेपू, कांदापात या पालेभाज्यांची लिलाव पद्धतीने विक्री होते.
गुरुवारी कोथिंबिरीच्या अकरा हजार जुड्यांची तर मेथीच्या केवळ एक हजार तीनशे वीस जुड्यांची आवक झाली. आवक घटल्याने बाजारभाव कडाडले. आगामी काळात आवक कमी झाल्याने बाजारभाव आणखी वाढू शकतात, असे सभापती थोरात यांनी सांगितले.