Methi Kothimbir Rate
दिवे: पुरंदर तालुक्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजना तसेच शेततळ्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी फळबागांसह तरकारी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. त्यात मेथी, कोथिंबीर, शेपू, कांदापात, वाटाणा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो आदी पिकांचा समावेश आहे. आता या पिकांचे उत्पादन वाढले असले, तरी त्यांना योग्य दर मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
सध्या तालुक्यातील शेतकर्यांना मेथी, कांदापात वगळता इतर भाजीपाला तीन-चार रुपये भावाने विकावा लागत आहे. फ्लॉवरला किलोला अवघा दहा रुपये असा नीचांकी दर मिळत आहे. कोबी, टोमॅटो अशा खर्चीक पिकालादेखील समाधानकारक दर मिळत नाही. यामुळे काढणीचा व वाहतूक खर्चही भागत नाही. परिणामी, अनेकदा शेतमाल फेकून द्यावा लागत असल्याचे परिसरातील शेतकर्यांनी सांगितले. (Latest Pune News)
शेतकरी आला मेटाकुटीस
ढुमेवाडी येथील बाजार संध्याकाळी सहा वाजता सुरू होतो, तर सासवडचा बाजार सकाळी सहा वाजता सुरू होतो. त्यामुळे ढुमेवाडी येथे माल शिल्लक राहिल्यास सकाळी सासवडच्या बाजारात जायचे, अशी कसरत शेतकर्यांना करावी लागत आहे. अलीकडच्या काळात खते व बियाण्यांचे वाढलेले भाव आणी शेतमालाला मिळणार्या कमी दरामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
शेतकर्यांचे हात रिकामेच
पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावचे शेतकरी सचिन कोलते यांनी ढुमेवाडी येथील बाजारात विक्रीसाठी कोथिंबीर आणली होती. त्यांना एका जुडीला अवघा दोन ते तीन रुपये बाजार मिळाला. यात काढणीचा खर्च वगळता शेतकर्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिले नाही.
उत्पादन खर्चात वाढ
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकांना कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकर्यांना पिकांवर सतत औषध फवारणी करावी लागते. त्यातून उत्पादन खर्च वाढतो. त्यातच सध्या शेतमालाला खूपच कमी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहेत.