

मंचर: मंचर (ता. आंबेगाव) येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा जादूटोण्याचा अघोरी प्रकार गुरुवारी (दि. 17) पुन्हा घडला. येथे अंत्यविधी झालेल्या ठिकाणी रात्री उशिरा अज्ञाताने गुलाल उधळत विधी केला. एकाच महिन्यात दोनवेळा असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेर्याचा वीजपुरवठा तोडून हा प्रकार करण्यात आला.
मंचर येथील शिवसैनिक दत्तात्रय नथू थोरात (वय 45) यांचे बुधवारी (दि. 16) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी गुरुवारी तपनेश्वर स्मशानभूमीत सायंकाळी झाला. दुसर्या दिवशी सकाळी सावडण्याचा कार्यक्रम असल्याने थोरात कुटुंबीय नातेवाईक स्मशानभूमीत आले असता ज्या ठिकाणी थोरात यांचा अंत्यविधी झाला, तेथे चितेवर काहीतरी जळत होते, तसेच गुलालाच्या साहाय्याने रिंगण काढून हळदी-कुंकू वाहत पूजा, विधी केल्याचेसुद्धा दिसत होते. (Latest Pune News)
त्या वेळी मंचर येथील शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले आणि थोरात कुटुंबीयांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अंत्यविधी झाल्याच्या रात्रीच अज्ञाताने सीसीटीव्ही कॅमेर्याला वीजपुरवठा करणारे कनेक्शन तोडल्याचे दिसून आले.
तेथे मुक्कामी असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने स्मशानभूमीत प्रवेश करत गुलाल उधळत अघोरी प्रकार केला. मंचर नगरपंचायत आणि मंचर पोलिसांनी समाजकंटकाचा शोध घेऊन छडा लावावा, आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत, तसेच या व्यक्तीबाबत मंचर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी; अन्यथा आम्हाला स्मशानभूमीत बसून आंदोलन करावे लागेल, असा इशारा राजाराम बाणखेले यांनी दिला.
30 जूनलादेखील घडला होता असाच प्रकार
शेवाळवाडी येथील नानाभाऊ श्रीपती थोरात (वय 85) यांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. मंचर येथील तपनेश्वर स्मशानभूमीत त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम सोमवारी दि. 30 जून रोजी होता. त्या वेळी थोरात कुटुंबीय, नातेवाईक सावडण्यासाठी आले असता त्यांना अंत्यविधी झालेल्या ठिकाणी राखेत लिंबू, नारळ, कोहळे, सुरी, बांगड्या, हळदी-कुंकू, टाचण्या, दाबण इत्यादी वस्तू आढळून आल्या होत्या.
या घटनेनंतर मंचर शहर व परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता व स्मशानभूमीत सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंचर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांनी पुढील काळात असे प्रकार होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.
घडलेला प्रकार निंदनीय आहे. समाजात आजही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावली असल्याचे यावरून दिसत आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्याबाबत असे कृत्य केले जात असल्याने हा सर्व प्रकार मंचर शहरासाठी अशोभनीय आहे. महिन्यात दोनवेळा असे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- राजाराम बाणखेले, जिल्हा संघटक, शिवसेना (उबाठा)