पुणे

लहुजी साळवे स्मारकाबाबत लवकरच बैठक : माजी खासदार आढळराव पाटील

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व क्रांतिगुरू लहुजी साळवे शासन समिती यांच्यासमवेत शासकीय बैठकीचे लवकरच आयोजन करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे उपनेते तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 12 जुलै 2023 रोजी सामाजिक न्याय विभाग शासन निर्णयनुसार क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक शासन समिती गठित करण्यात आली. या समितीच्या शिष्टमंडळाने शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाराष्ट्रातील हे स्मारक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य क्रांतीची प्रेरणा देणारे आहे. या स्मारकाच्या विकासाचे काम करण्यात येईल. या विकासकामासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी सातत्याने मी समन्वय साधणार असल्याचे सांगितले.

या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील अनेक विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचा व समाजविकासास हातभार लावता येईल. 'बार्टी'च्या धर्तीवर या स्मारकाचा निश्चित उपयोग होईल. हे स्मारक मातंग समाजविकासाचे परिवर्तन केंद्र पुण्यातील संगमवाडी येथील स्मारक असले पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार्‍या बैठकीत स्मारक विकास आराखड्याबाबत चर्चा होऊन पुणे पालिका येथे आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीचा आढावा देण्यात येणार आहे. या वेळी क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक शासन समितीचे अध्यक्ष अशोकराव लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू, सदस्य प्रा. काशिनाथ आल्हाट, सदस्य रामदास साळवे व इतर बहुजन समाजबांधव या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT