Sharad Pawar : शरद पवारांचा जुन्नर दौरा कोणाला फायद्याचा ठरणार?

NCP Crisis
NCP Crisis

ओझर : जुन्नर तालुक्यात झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा दौरा कोणाच्या फायद्याचा ठरणार? सत्यशील शेरकर आघाडीचे उमेदवार असणार की तटस्थ असलेले आमदार अतुल बेनके शरद पवार यांच्यासोबत राहणार? याबाबतची उत्सुकता जुन्नर तालुक्यातील जनतेला लागली आहे. कदाचित, विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँगेसमधील गटांचेच मनोमीलन होऊ शकते, असेही काही कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत.

शरद पवार यांच्या जुन्नर दौर्‍याने तालुक्याच्या एकंदर राजकीय स्थितीत अनेक बदल भविष्यात घडतील, अशी चाहूल लागावी अशीच स्थिती सध्या आहे. यापूर्वी शरद पवार जेव्हा जुन्नर, आंबेगावच्या दौर्‍यावर येत तेव्हा सोबत दिलीप वळसे पाटील असत. या वेळी प्रथमच ते जुन्नरला सोबत नसताना त्यांची उणीव दिसणार नाही, याची पुरेपूर काळजी शरद पवार यांनी घेतली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके तटस्थ राहिले व त्यांची भूमिका अजूनही गुलदस्तात असल्याचे पाहायला मिळते. शरद पवार तालुक्यात आल्यावर त्यांचे स्वागत, त्यांचे जेवण हे सगळे नियोजन खासदार अमोल कोल्हे यांनी सांभाळल्याने ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सध्यापुरते तरी दिसले. शरद पवार यांची ही सगळी व्यवस्था खासदार डॉ. कोल्हे यांनी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे युवा नेते सत्यशील शेरकरांकडे केली. कारखाना परिसरात हेलिकॉप्टर उतरविले व थेट शेरकरांचे घर गाठले. या वेळी पवार यांनी सोबत गाडीत खासदार कोल्हे, आमदार बेनके व शेरकर यांना घेतले.

शेरकरांच्या घरी जेवण व पत्रकार परिषद घेत पवार थेट सभेकडे रवाना झाले. जेवण झाल्यावर ते माजी आमदार वल्लभ बेनके यांना भेटायला जाणार होते. परंतु, जुन्नरच्या सभेला उशीर झाल्याने तिकडे न जाता थेट सभेकडे गेले. यामुळे काही काळ संभ—माचे वातावरण तयार झाले होते. परंत, सभा संपल्यानंतर ते आपले जुने सहकारी माजी आमदार वल्लभ बेनके यांना भेटायला नारायणगावला त्यांच्या निवासस्थानी गेले.

जुन्नरच्या आदिवासी मेळाव्याची सर्व जबाबदारी स्वागताध्यक्ष म्हणून आमदार अतुल बेनके यांनीच सांभाळली होती. पण, मग खरे वास्तविक हेलिकॉप्टर नारायणगावला माजी आमदार बेनके यांच्या घरासमोरील पटांगणात उतरवता आले असते. तिथे बेनके यांना भेटून सभास्थळी जाता आले असते. पण, आ. अतुल बेनके यांच्या तटस्थ भूमिकेमुळे शरद पवार सत्यशील शेरकर यांच्या रूपाने विधानसभेकरिता पर्याय शोधत तर नसतील ना? कारण, तसा दौरा व थेट कारखान्यावर शरद पवार यांचे आगमन. सत्यशील शेरकर यांच्या घरी जेवण, या सगळ्या गोष्टी बरेच काही सांगून जातात, हे वेगळे सांगायला नको. पक्षाचे राज्य प्रचारप्रमुख खासदार डॉ. अमोल कोल्हे जर आपल्याच तालुक्याचा आमदार शरद पवार यांना देऊ शकले नाहीत, तर नामुष्की यायला नको म्हणून खा. डॉ. कोल्हे हे शेरकरांना उमेदवारी मिळावी व शरद पवार यांना तालुक्यात सक्षम उमेदवार पर्याय मिळावा, यासाठी प्रयत्न तर करीत नसतील ना? अशी शंका राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

विद्यमान आमदार अतुल बेनके यांची तटस्थ भूमिकाच त्यांना त्रासदायक ठरतेय की काय? अशी शंका निर्माण होत असताना आ. बेनके हे काही इतक्या सहजासहजी यातून बॅकफूटला जातील, असे नाही. त्यांनाही अनेक डाव-प्रतिडाव माहीत आहेत. शरद पवार जेव्हा नारायणगावला आले तेव्हा कार्यकर्त्यांनी पवार, बेनके यांच्या घोषणा दिल्या. बेनके यांच्या घरी पवार आले तेव्हा त्यांच्यासोबत सत्यशील शेरकरही होते.

आगामी काळात आ. बेनके काय निर्णय घेतात? यावर बरेच अवलंबून आहे. राजकारणातील बाळकडू आ. अतुल बेनके यांना माजी आमदार वल्लभ बेनके यांच्याकडून मिळाले आहे, त्यामुळे जुन्नरच्या जनतेचा कौल विचारात घेऊन ते योग्य निर्णय नक्की घेऊ शकतात. सध्यातरी बेनके-शेरकर भाऊ भाऊ म्हणून वावरतात. परंतु, आगामी काळात एकमेकांच्या आमने-सामनेही पाहायला मिळू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news