पुणे

दुष्काळात मांसाहाराचे दर चढेच! ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांवर परिणाम

Laxman Dhenge

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात तीव्र दुष्काळ असून, दिवसेंदिवस कोंबडीच्या खाद्यातील दरवाढीमुळे तसेच पोल्ट्रीतील दगावत असलेले पक्षी, यामुळे चिकनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. थंडीमध्ये 180 रुपये किलो असलेल्या चिकनचा दर सध्या 260 किलो झाला आहे. तसेच गावरान कोंबडीचे दरही वाढले आहेत. याचा परिणाम ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांवर होऊ लागला आहे. वाल्हे व परिसरात अनेक पोल्ट्री व्यावसायिक आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी चिकनचे दर 110 ते 130 रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. आता चिकनचे दर दुपटीपेक्षा अधिक झाले आहेत. सध्या 260 रुपये प्रतिकिलो दराने चिकनची विक्री होत आहे. मागील वर्षी 110 ते 120 रुपयांना मिळणारी जिवंत कोंबडी आज 160 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागत आहे. कोंबड्यांची संख्या कमी झाल्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या वर्षी वाढत्या उन्हाने पोल्ट्रीतील पक्षी मरत आहेत. तसेच पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य, वाहतूक, पक्ष्यांच्या वाढलेल्या किमती, यामुळे चिकनचे दर वाढले आहेत. खाद्याचे दर दुप्पट झाले असल्याने पक्ष्यांचा सांभाळ करण्यास 110 ते 120 रुपयांपर्यंत खर्च येतो. सध्या मार्केटमध्ये चिकनचा तुटवडा आहे. हॉटेलचालक, ग्राहकांकडून मागणी कायम आहे. मार्केटमध्ये आवक कमी आणि मागणी कायम असल्याने दर वाढत चालले आहेत.

– सत्यवान सूर्यवंशी, विनय पवार, पोल्ट्रीचालक, वाल्हे

उन्हाळ्यात ग्रामीण भागात यात्रा-जत्रा असतात. मात्र, दरवर्षी चिकनचा बाजारभाव कमी असतो. या वर्षी मात्र चिकनचे बाजारभाव वाढले आहेत. त्याचा यात्रा-जत्रांवर परिणाम होत आहे. चिकनच्या वाढत्या बाजारभावामुळे चिकन विक्री निम्म्याने घटली आहे. दुकानातील मजुरांना दररोजची रोजंदारी मिळणेही शक्य होत नाही.

– गोरख कदम, चिकन विक्रेता, वाल्हे

गावरान कोंबडीच्या दरातही वाढ

बाॅयलर चिकनचे दर वाढत असताना दुसरीकडे गावरान चिकन (जिवंत कोंबडा) 650 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर, डुप्लिकेट गावरान म्हणून संबोधले जाणारे जिवंत कोंबडे 500 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याचे विक्रेते गोरख कदम, अहमद इनामदार यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT