पुणे: पान टपऱ्यांमधूनही ‘एमडी’सारख्या अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक मुद्दा पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत समोर आला. कासेवाडी आणि भवानी पेठ परिसरात अमली पदार्थांसह अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याची तक्रार नगरसेविका अर्चना पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे.
परिमंडळ क्रमांक एकअंतर्गत येणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागातील नगरसेवकांची बैठक मंगळवारी फरासखाना पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत नगरसेविका अर्चना पाटील यांनी कासेवाडी-डायसप्लॉट परिसरातील बेकायदा धंद्यांवर थेट भाष्य केले. पाटील यांनी केलेल्या निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक 22 कासेवाडी-डायसप्लॉट हा दाट लोकवस्तीचा झोपडपट्टी भाग आहे.
या परिसरात अवैध हातभट्टी दारू, चरस, एमडी तसेच ‘बटन गोळ्या’सारख्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी पान टपऱ्यांमधूनही एमडीसारखे पदार्थ मिळत असल्याची नागरिकांची तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यसनाधीनतेमुळे परिसरातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागात सातत्याने कारवाई करून अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.