पुणे: विमानतळ पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एमडी, मोटार असा 26 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय 37, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), उबेर अन्सार खान (वय 27, रा. रेल्वे गेटजवळ, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस कर्मचारी हरी पुंडे आणि लालू कऱ्हे या दोघांना बातमी मिळाली होती की, जनक बाबा दर्गा चौकाजवळ खराडी बायपास चौकातून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती एमडी विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्या पथकाने प्रीतम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3.59 ग््रॉम एमडी आणि दुचाकी जप्त करण्यात आली.
चौकशीत त्याने उबेर खान याचे नाव सांगितले. त्याला देखील पथकाने खुळेवाडी परिसरातून एमडी विक्रीसाठी आला असता पकडले. त्याच्या ताब्यातून चार ग््रॉम एमडी आणि चारचाकी मोटार जप्त करण्यात आली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, पोलिस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.