पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमास (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याची आमिषाने फसवणूक करणाऱ्या ठगाला येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपीने आत्तापर्यंत ४० विद्यार्थ्यांसह पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध हैदराबाद, मुंबईत फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत.
आदित्यकुमार ऊर्फ अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिंकदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या ठगाचे नाव आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका पालकाची आरोपी अरविंदने आठ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी १८ मार्च रोजी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपीला मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्यात त्याला अटक केली होती. त्याला ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. पुण्यातील येरवडा परिसारातील आरोपीने फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली.
त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला येरवडा पोलिसंनी तपासासाठी ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक किशोर बेरड, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के यांनी ही कामगिरी केली.
वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शनासाठी पुणे, मुंबईत शाखा
आरोपी आणि त्याचा साथीदाराने एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि. नावाची कंपनी हैदराबादमध्ये सुरू केली होती. या कंपनीच्या पुणे, मुंबईत शाखा सुरू केल्या होत्या. विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याची जाहिरात त्याने समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश मार्गदर्शनासाठी पाच लाख रुपये, खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी तीन लाख रुपये, असे शुल्क तो आकारत होता. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्यास पैसे परत करू, असे आमिष त्याने दाखविले होते. आत्तापर्यंत त्याने ४० विद्यार्थी तसेच पालकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.