पुणे : पुढारी वृत्तसेवा : मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए अभ्यासक्रमाबाबत अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेने (एआयसीटीई) विद्यार्थ्यांना जागरुक राहण्याचा इशारा दिला आहे. 'एमबीए क्रॅश कोर्स' ही दिशाभूल असून, अशा अभ्यासक्रमांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी या संदर्भातील जाहीर नोटीस संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
काही प्रेरणादायी वक्ते दहा दिवसांचा एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध करून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, असा क्रॅश कोर्स हा देशात तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संस्थेला किंवा विद्यापीठाला एमबीएसह कोणताही तंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रम एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय राबवता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
एमबीए हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे. व्यवसाय आणि व्यवस्थापनाबाबत प्रगत माहिती आणि कौशल्य देण्याची रचना अभ्यासक्रमात करण्यात आली आहे. त्यामुळे एमबीए अभ्यासक्रम (पदवी असल्यास) दहा दिवसांत पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे काही व्यक्ती, संस्थांकडून देण्यात येणारा एमबीए क्रॅश कोर्स चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याची नोंद सर्व भागधारकांनी घ्यावी, विद्यार्थ्यांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा