पुणे

मासळीचे बाजारभाव कडाडले; उजनीतील आवक कमी झाल्याचा परिणाम

Laxman Dhenge

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळा सुरू होऊन सूर्य आग ओकत आहे. त्यातच उजनीची पाणीपातळी वजा 20 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. पाणीसाठा वरचेवर कमी होत असल्याने उजनी जलाशयातील (गोड्या पाण्यातील) माशांची आवक मोठ्या प्रमाणात कमी होऊन मागणी मात्र जास्त आहे. परिणामी मासळी लिलाव काट्यावरील दर कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे मासेप्रेमींना आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागत आहेत.

उजनी धरण परिसरात दरवर्षी पाणीसाठा कमी होताच वडाप व पंडी जाळी टाकून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात होती; मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यांपूर्वी शासनाने पहिल्यांदाच उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात रोहू, कटला, मृगल या जातींचे मासे सोडून उजनीतील मत्स्यसंपदा वाढवून, पाणीप्रदूषण कमी करण्याचा व दुसर्‍या बाजूने मच्छीमारांचा मत्स्य उद्योग वाढविण्याचा अतिशय चांगला आणि स्तुत्य निर्णय घेतला आहे. यामुळे नुकतेच सोडलेल्या शासकीय लहान मासळी वाचवण्यासाठी उजनीतील सर्व वडाप व लहान मासे मारणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यातच बदलत्या वातावरणामुळे मासळीची आवक घटल्यामुळे लिलाव काट्यावरील मासळीचे बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत.

मासळीचे बाजारभाव पुढीलप्रमाणे

मासळी दर (किलो)

  • लहान चिलापी 60 ते 80
  • मोठी चिलापी 70 ते 110
  • रोहू 150 ते 200
  • कटला 150 ते 240
  • मरळ 360 ते 400
  • वाम 500 ते 550

हेही वाचा

SCROLL FOR NEXT