Marigold Pudhari
पुणे

Maharashtra Marigold Price Hike: झेंडू फुलांनी गाठले द्विशतक; अकलूज बाजारात किलोला २०० रुपयांचा विक्रमी दर

अधिक मासातील वाढती मागणी आणि घटलेली आवक; झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

बावडा: सध्या अधिक मासामुळे झेंडूच्या फुलांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे बाजारातील फुलांची आवक कमी झाली आहे. परिणामी अकलूज येथील बाजारात झेंडूचा किरकोळ विक्रीचा दर हा प्रतिकिलो विक्रमी २०० रुपये आहे. एकंदरीत, सध्या झेंडू फुलाच्या दराने द्विशतक गाठल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उन्हाळ्यात पाण्याची कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी झेंडू पिकाकडे पाठ फिरवली आहे. तसेच सध्या शेतातील तुरळक ठिकाणी उभ्या असलेल्या झेंडू पिकाचे उत्पादनही पाण्याची टंचाई व वाढलेल्या तीव्र तापमानामुळे कमी झाले आहे. परिणामी झेंडू फुलाची आवक घटल्याने अकलूज येथील बाजारामध्ये मंगळवारी (दि.९) झेंडूच्या फुलांना किलोला २०० रुपये दर मिळाला.

सध्या तीन वर्षांतून एकदा येणारा अधिक महिना सुरू आहे. धार्मिक विधीसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. तसेच लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा तसेच इतर शुभकार्यांसाठी झेंडूच्या फुलांना मागणी कायम आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे फुलांची गुणवत्ता आणि उत्पादनावर परिणाम झाल्याने बाजारात अपेक्षित प्रमाणात झेंडूची आवक होत नाही, त्याचा थेट परिणाम झेंडू फुलांच्या विक्रमी दरवाढीवर झाला आहे.

इंदापूर तालुक्यात अनेक शेतकरी वर्षभर झेंडूचे पीक घेत आहेत. तसेच अनेक शेतकरी झेंडूचे पीक हे आंतरपीक म्हणून घेतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या झेंडूच्या फुलांची आवक कमी आणि मागणी जास्त आहे. यातून फुलांचे दर वाढून नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.

दरम्यान, आता झेंडूच्या फुलांची बाजारातील आवक तत्काळ वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे आगामी एक-दोन महिने तरी झेंडू फुलांचे दर तेजीतच राहतील, अशी शक्यता फूल विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT