सुवर्णा चव्हाण
पुणे: रंगमंचावर एखादी भूमिका साकारताना कलाकाराला मिळणाऱ्या टाळ्या जितक्या महत्त्वाच्या, तितकेच त्या प्रयोगामागे काम करणारे अनेक हातही महत्त्वाचे असतात. आतापर्यंत रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला आता केवळ अभिनयापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत.
नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत संयोजन, रंगभूषा आणि नाट्यव्यवस्थापन, अशा विविध जबाबदाऱ्या त्या समर्थपणे सांभाळत आहेत. व्यावसायिक रंगभूमी असो, प्रायोगिक नाटकांचे प्रयोग असोत किंवा दीर्घांक; प्रत्येक ठिकाणी महिलांचा सहभाग वाढताना दिसत आहे. पडद्यावर आणि पडद्यामागेही स्वतःची क्षमता सिद्ध करणाऱ्या महिलांमुळे मराठी रंगभूमीचे चित्र बदलत असून, हा बदल रंगभूमीच्या दृष्टीने सकारात्मक ठरत आहे.
पूर्वी रंगभूमीवर महिलांची भूमिका प्रामुख्याने अभिनयापुरती मर्यादित असल्याचे चित्र होते. मात्र, आता नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर महिला काम करताना दिसत आहेत. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. त्यानिमित्ताने मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. गुरुवारी (दि. ५) साजऱ्या होणाऱ्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने महिला कलाकारांशी संवाद साधला.
अनेक महिला स्वतःच्या संकल्पना घेऊन नाटकांची निर्मिती करत आहेत. लेखन, दिग्दर्शनापासून ते प्रकाशयोजना आणि नेपथ्यापर्यंतची जबाबदारी स्वीकारत आहेत. दीर्घांकांच्या माध्यमातूनही महिलांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे. रंगभूमीवरील महिलांच्या वाढत्या सहभागाबाबत नाट्यनिर्मात्या आणि अभिनेत्री भाग्यश्री देसाई म्हणाल्या, मराठी रंगभूमीवर महिलांचा सहभाग हळूहळू वाढत आहे. पूर्वी प्रामुख्याने अभिनेत्री म्हणून महिलांकडे पाहिले जायचे; मात्र आता अभिनयासोबतच दिग्दर्शन, निर्मिती आणि तांत्रिक क्षेत्रांतही काही महिला काम करताना दिसत आहेत. ही बदलाची सुरुवात नक्कीच आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर हा सकारात्मक बदल दिसू लागला आहे. रंगभूमीवर एखादी भूमिका साकारण्यापासून ते संपूर्ण नाटकाची जबाबदारी सांभाळण्यापर्यंत महिलांनी विविध क्षेत्रांत आणखी पुढे येण्याची गरज आहे.
प्रकाशयोजना, नेपथ्य, मेकअप, तांत्रिकमध्येही महिला
मराठी रंगभूमीवर महिला कलाकारांचा सहभाग निश्चितच वाढताना दिसत आहे. विशेषतः प्रायोगिक रंगभूमीवर अभिनयाबरोबरच दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य, मेकअप, संगीत संयोजन आणि तांत्रिक विभागांमध्येही महिला जबाबदारीने काम करत आहेत. सध्या अनेक नाटकांच्या टीममध्ये महिला कलाकार आणि तंत्रज्ञांची संख्या लक्षणीय आहे. आमच्या नाटकाच्या बाबतीतही प्रकाशयोजनेपासून ते व्हिज्युअल डिझाइनपर्यंतची जबाबदारी महिलांनी सांभाळली होती. प्रामुख्याने प्रायोगिक रंगभूमीवर महिला कलाकार अभिनयासह दिग्दर्शन, निर्माता, लेखन, प्रकाशयोजना अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना दिसत आहेत, असे नाट्य कलाकार निकिता ठुबे यांनी सांगितले.
मी नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, अभिनय आणि वेशभूषा अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर सध्या महिलांचा सहभाग नक्कीच वाढत आहे. अगदी महिला कलाकार महाराष्ट्रसह परदेशातही नाटकांचे दौरेही करत आहेत. खास महिलांची भूमिका असलेले नाटकांची निर्मिती केली जात आहे. हा सकारात्मक बदल असून, रंगभूमीवर महिला आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण करत आहे. अगदी नाटकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही त्या सांभाळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नाटकांसह एकांकिका स्पर्धा, नाट्य महोत्सवातही महिला आणि युवतींची चमक पाहायला मिळत आहे.वृंदा साठे, नाट्य कलाकार.