पुणे

आजपासून मराठा समाज सर्वेक्षण; पालिका कर्मचारी देणार घरांना भेटी

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मंगळवार (दि.23) पासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि.22) तब्बल 2 हजार कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नोडल अधिकारी, पर्यवेक्षक व प्रगणक नेमले आहेत. त्यांना संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात तीन सत्रात वेगवेगळ्या तीन गटात प्रशिक्षण देण्यात आले.

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या अधिकारी (मास्टर ट्रेनर) विशाल गायकवाड यांनी सर्वेक्षणाचे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड कसे करायचे. नोंद केलेली माहिती कशी सेव्ह करायची, ती माहिती डिलीट होणार नाही याची कशी दक्षता घ्यायची आदी तांत्रिक माहिती सविस्तर दिली. सहायक झोनल अधिकारी तथा सहायक आयुक्त अविनाश शिंदे व उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण व नोंदी कश्या घ्यायच्या याबाबत माहिती दिली. करसंकलन विभागाच्या 17 झोननुसार घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

कसे प्रश्न विचारावेत. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशी जात असल्यास त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरून घेणे. एकूण 182 छोटे पर्याय प्रश्न आहेत. एका कर्मचार्यास (प्रगणक) दिवसाला 50 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. एकूण 350 ते 400 घरांना येत्या सात दिवसांत भेट देऊन सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. एकूण 15 प्रगणकांसाठी 1 पर्यवेक्षक नेमण्यात आला आहे. पर्यवेक्षक क्षेत्रीय अधिकार्यांना जोडले आहे. त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपचे गु्रप तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, कर्मचार्‍यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न व शंकाचे निरसन करण्यात आले. प्रशिक्षण वर्गास 95 टक्के उपस्थिती होती. क्षेत्रीय अधिकारी तसेच, निवडणूक विभाग प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, रमेश डाळिंबे व कर्मचारी उपस्थित होते.

'कर्मचार्‍यांना माहिती देऊन सहकार्य करावे'

राज्य शासनाच्या सूचनेवरून महापालिकेचे कर्मचारी मंगळवार (दि.23) ते बुधवार (दि.31) या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यांच्याकडे महापालिकेचे ओळखपत्र असणार आहे. नागरिकांनी त्या कर्मचार्‍यांना आपली माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहायक झोनल अधिकारी अविनाश शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT