पुणे

Maratha Reservation : मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे आजपासून सर्वेक्षण

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण आज मंगळवार (दि. 23) पासून केले जाणार आहे. हे सर्वेक्षण 31 जानेवारी -पर्यंत पूर्ण करायचे असून, त्यासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे नऊ हजारांपेक्षा अधिक प्रगणकांची नियुक्ती केली आहे. हे प्रगणक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडील प्रशिक्षकांमार्फत (मास्टर ट्रेनर) तालुका प्रशिक्षक तसेच जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील समन्वय (नोडल) अधिकारी आणि सहायक नोडल अधिकार्‍यांना मास्टर ट्रेनर अश्विनी सोनटक्के यांनी प्रशिक्षण दिले. तर अधिकार्‍यांनी वॉर्ड व तालुक्याचे प्रशिक्षक 21 आणि 22 जानेवारीला संबंधित तालुक्याच्या किंवा वॉर्डाच्या ठिकाणी नियुक्त कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. आजपासून प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. येत्या 31 जानेवारीपूर्वी सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे.

प्रत्येक तालुक्यातून 300 प्रगणकांमागे 1 प्रशिक्षक, 300 ते 600 साठी 2 प्रशिक्षक तर 600 पेक्षा जास्त प्रगणकांसाठी 3 प्रशिक्षक असे तालुका प्रशिक्षक नियुक्त केले आहेत. शासनाने मोबाईल अ‍ॅप तयार केले असून, त्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रगणकाकडे 100 कुटुंबांचे सर्वेक्षणाचे काम देण्यात आहे. त्यासाठी आयोगाकडून प्रगणकांसाठी ओळखपत्रे पुरविली आहेत. सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर 15 नोडल अधिकारी, 15 सहायक नोडल अधिकारी, 466 पर्यवेक्षक व 6 हजार 596 प्रगणकांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT