बालेकिल्ला सावरण्यासाठी जयंत पाटील यांची मोर्चेबांधणी | पुढारी

बालेकिल्ला सावरण्यासाठी जयंत पाटील यांची मोर्चेबांधणी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातही या पक्षात दुफळी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः सांगली जिल्ह्यात पक्ष मजबुतीसाठी लक्ष घातल्याने पक्षातील अनेकजण त्यांच्या गटात जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर बालेकिल्ला सावरण्यासाठी आमदार जयंत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. शहर, ग्रामीण पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. त्यानंतर आता मंगळवारी (दि. 23) येथे जिल्ह्यातील महिलांचा मेळावा आहे. मेळाव्याला आमदार पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह पक्षाचे आमदार उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य पातळीवरील दुफळीनंतर जिल्ह्याचे राजकारण वेगळ्या वळणावर आले आहे. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात आमदार पाटील यांच्या गटाला ओहोटी लागली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील यांना त्यांनी राष्ट्रवादीत घेण्याचे नियोजन केले. त्यांचेच पुत्र वैभव पाटील यांनी अजित पवार गटाचा रस्ता धरला. आमदार पाटील यांचे एकेकाळचे बिनीचे शिलेदार मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत आहेत. मुदत संपलेल्या महापालिकेतील 15 सदस्यांपैकी 14 सदस्य आणि दोन माजी महापौरही या गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

सांगली जिल्हा हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात होता. तो अबाधित ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. गट सोडून जात असलेल्यांना रोखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार गटातील पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर होताच त्यांनी शहर कार्यकरिणीची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतरजयंत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन चहापान केले.

राजारामबापू पाटील यांच्या पुतळा अनावरणाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या उपस्थितीत येथे भव्य कार्यक्रम घेतला. त्यामध्ये त्यांनी जयंत पाटील यांना साथ द्या असे आवाहन केले. राजकारणपलीकडचा घरचा कार्यक्रम म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे जयंत पाटील यांच्या सल्ल्याने व मदतीने राजकारण करणार्‍या भाजप नेत्यांनी मात्र पाठ फिरवली. त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. अजित पवार पाच फेब्रुवारीस जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेकजण पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटाचा खरा कस लागणार आहे. काँग्रेस- भाजपचे काय होणार, दोन्ही राष्ट्रवादीपैकी कोणता गट बाजी मारणार, जयंत पाटील यांना गड सावरता येणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळणार आहेत.

जयंत पाटील यांना जिल्ह्यात रोखण्याची खेळी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार व जयंत पाटील यांच्यात अनेक वर्षापासून राजकीय वाद आहे. पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर जयंत पाटील यांनी राज्यात विविध उपक्रम राबवत पक्ष बांधणी केली. कार्यक्रत्यांचे जाळ तयार केले. आगामी निवडणुकीत त्यांना मतदार संघात व जिल्ह्यातच रोखण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

Back to top button