पुणे

Maratha Reservation : शहरात साडेचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील साडेचार घरांना भेटी देऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. हे प्रमाण 80 टक्के इतके आहे. सर्वेक्षण आणखी दोन दिवस करण्यात येणार आहे. या दोन दिवसांत उर्वरित दोन लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी शहरात मंगळवार (दि.23) पासून सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने 2 हजार 300 कर्मचारी नेमले आहेत. सर्वेक्षणाची पहिली मुदत बुधवारी (दि.31) संपली. आजअखेर शहरातील 4 लाख 50 हजार घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे.

यात अनेक अडथळे येत असले तरी प्रगणक व पर्यवेक्षक ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ऑनलाईन मोबाईल अ‍ॅपवर जमा झालेल्या नोंदींचा डाटा थेट मागासवर्गीय आयोगाच्या सर्व्हरवर जमा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात किती मराठा-कुणबी नोंदी आढळल्या याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. या अ‍ॅपमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. अ‍ॅप हँग होत आहे. काही भागांमध्ये जात विचारल्यामुळे सर्वेक्षणास विरोध केल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. जात विचारल्याने काही जणांना नोंदणी केली नाही. तर, काही घरे बंद होती. बंद घरांना पुन्हा भेट देऊन सर्वेक्षण पूर्ण केले जात आहे. सद्य:स्थितीत शहरात साडेचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित 20 टक्के सर्वेक्षण दोन दिवसांत करावे लागणार आहे. सर्वेक्षणास शासनाने शुक्रवार (दि.2) पर्यंत दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

सर्वेक्षण झाले असल्यास पुन्हा माहिती देण्याची गरज नाही

नागरिकांनी महापालिका कर्मचार्‍यांना सर्व माहिती द्यावी. गावी किंवा मूळ घरी सर्वेक्षण झाले असल्यास पुन्हा माहिती देऊ नये. घर बंद असल्यास पुन्हा जाऊन सर्वेक्षण करण्याचा सूचना दिल्या आहेत. सर्वेक्षणातून एकही घर सुटणार नाही, याची दक्षता घेण्यात आली असून, तसे नियोजन केले आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT