सुनील जगताप
पुणे: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या चार वर्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीमध्ये एमएओचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांच्या कबड्डी संघटनेलाच मतदानापासून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे एमएओचे अध्यक्ष कोण असतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने मतदानास पात्र यादी जाहीर केली आहे. यातून उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनला वगळले आहे. गमतीची बाब म्हणजे, या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे यापुढे ते या अध्यक्षपदावर विराजमान होणार का किंवा एमएओ संघटनेला नवे अध्यक्ष मिळणार, असा प्रश्न क्रीडा जगतातून विचारला जात आहे. (Latest Pune News)
राज्यात कबड्डी, कुस्ती संघटनांमध्ये अधिकृत संघटना कोणती, यावर न्यायालयात दावा सुरू आहे. तशाच पद्धतीने कुस्ती संघटनेतही वाद सुरू आहे. यासह अन्य संघटनांमध्ये कमी - अधिक प्रमाणात दावे सुरू आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी संलग्न आहे. त्यामुळे खेळाडूंच्या भविष्यासाठी नव्हे, तर कायदेशीरदृष्ट्या गंभीर बाब मानली जात आहे.
यादीत नसलेल्या संघटनांना अधिकृत मान्यता नसलेल्या संघटना म्हणून गणले जाऊ शकते. त्यामुळे या खेळातील खेळाडूंचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पालक, खेळाडू, प्रशिक्षकांनी या निर्णयावर राज्य शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने या यादीबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी 16 ते 25 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी पाच दरम्यान मुदत दिली आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या जाहीर झालेल्या कार्यक्रमामध्ये 22 क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला डावलण्यात आले आहे. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असून एमएओकडे हरकतही नोंदविणार आहे.- बाबूराव चांदेरे, सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन