

Dengue cases rise in Pune city
पुणे: पावसाळ्याचा हंगाम संपत असताना डेंग्यूच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत शहरात डेंग्यूचे 32 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहे. तर, 285 संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये नोंदवली गेलेली ही या वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
शहरात आतापर्यंत 1,699 संशयित डेंग्यू रुग्ण आढळून आले. त्यापैकी 83 डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांसह 20 चिकुनगुनियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. फेबुवारीत 4, एप्रिल व मे महिन्यामध्ये प्रत्येकी 2, जूनमध्ये 4, जुलैमध्ये 11, ऑगस्टमध्ये 28 रुग्णांची नोंद झाली होती. (Latest Pune News)
गेल्या पंधरवड्यातील अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून, त्यामुळे डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात महापालिकेकडून 210 आस्थापनांना नोटिसा दिल्या असून, 26,300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे म्हणाले, आरोग्य विभाग व मलेरिया सर्वेक्षण अधिकारी आणि टीम घरे, चाळी व सार्वजनिक ठिकाणी जाऊन डासांचे निर्मूलन करत आहेत.
फॉगिंग व कीटकनाशक फवारणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. संशयित रुग्णांवरही नियंत्रणात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. आमच्याकडे पुरेसा साठा उपलब्ध असून, बायो लार्व्हिसाइड्स, कीटकनाशके, औषधे व टेस्टिंग किट्स महापालिकेच्या रुग्णालये व सेंटीनेल केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत.