

पुणे: इंग्रजांनी भारतीय शिक्षण पद्धती बंद केली आणि त्यांची शिक्षण पद्धती आपल्याकडे रुजवली. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या शिक्षण पद्धतीत बदल होणे अपेक्षित होते. परंतु, तसा फारसा बदल झाला नाही. इंग्रजांचे काही नियम, अटी या स्वातंत्र्यानंतरही देशात लागू होते. शिक्षणातून पुढील पिढ्या बदलणार आहेत.
त्यात सध्या देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले असून, नव्या धोरणात आपल्याला प्राचीन काळापासूनच्या इतिहासाचे शिक्षण दिले जाणार आहे, नव्या शैक्षणिक धोरणाचा आपण स्वीकार करावा, असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. (Latest Pune News)
मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग््रााम दिनानिमित्त मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव 2025 चे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने मराठवाडाभूषण पुरस्कारांचे वितरण बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला राज्याच्या विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, सचिव दत्तात्रय मेहेत्रे या वेळी उपस्थित होते.
यंदाचा मराठवाडाभूषण पुरस्कार हरिश्चंद्र सुळे (समाजकार्य), राहुल कुलकर्णी (पत्रकारिता), ओमप्रकाश यादव (प्रशासकीय), संस्कृती संवर्धन मंडळ, जि. नांदेड (शैक्षणिक), दत्तात्रय जाधव (कृषी) आणि राजेंद्र नारायणपुरे (उद्योजक) यांना प्रदान करण्यात आला.
तरुणांनो, मोठी स्वप्नं पाहा
प्रा. शिंदे म्हणाले, मराठवाड्याला मागास समजण्याची गरज नाही. आपण संघर्ष करून, प्रयत्नपूर्वक प्रगती केली आहे. त्यामुळे मराठवाडा मागास नाहीतर अग्रेसर आहे, असे मराठवाड्यातील लोकांनी बोलले पाहिजे. कुठे कमी असलाच, तर संबंधित क्षेत्रात प्रयत्न करून अग्रेसरपद मिळवू, असा निश्चय केला पाहिजे. मराठवाड्यातील तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत. मराठवाडा मुक्त करून देणाऱ्यांचे स्मरण केले पाहिजे. मराठवाडाभूषण पुरस्कार पुढील वेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त केलेल्या व्यक्तींना देखील मिळावा.