पुणे

पुणे : प्रभाग हलले…. पैसे घेतले!

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना अनुकूल करण्यासाठी मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची जोरदार कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय मंडळींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या 173 नगरसेवकांसाठीच्या 58 प्रभागांची अंतिम रचना शुक्रवारी रात्री जाहीर झाली. यात तीनसदस्यीय 57, तर दोनसदस्यीय एका प्रभागाचा समावेश आहे. महापालिकेनी जी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली होती. त्यामधील 32 प्रभागांमध्ये छोट्या-मोठ्या बदलांनंतर अंतिम प्रभागरचना जाहीर झाली. मात्र, ही प्रभागरचना प्रसिध्द झाल्यानंतर आता त्यासंबंधीच्या अनेक सुरस कथा ऐकू येऊ लागल्या आहेत.

काही लाखांत 'डील'!

पुण्यातील प्रभागरचना करताना काही मंडळींनी इच्छुकांकडून चांगलेच हात ओले करून घेतल्याची थेट चर्चाच सुरू झाली आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस या पक्षांतील काही मंडळींचे प्रभाग अनुकूल करून देण्यात आले. त्यासाठीची रक्कम काही लाखांत असल्याचेही सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रभागरचनेच्या प्रक्रियेत असलेल्या महाविकास आघाडीमधील पदाधिकार्‍यांची नावे चर्चेत आहेत. त्यांच्या पक्षातील मंडळींनी आता प्रभागरचना जाहीर झाल्यावर तोंडे उघडण्यास सुरुवात केल्याने हे प्रकार चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. धक्कादायक म्हणजे यामधील काही मंडळींनी आर्थिक देवाण करून त्यांचे प्रभाग त्यांच्या पद्धतीने झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपतील दिग्गजांचाही सहभाग!

सर्वाधिक आश्चर्याची बाब म्हणजे भाजपमधील ज्या काही मंडळींना प्रारूप प्रभागरचनेत अडचणीचे झाले होते, ते अंतिम रचनेत अनुकूल झाले आहेत. यामध्ये हडपसर मतदारसंघात भाजपच्या एका पदाधिकार्‍याच्या प्रभागात आलेला मुस्लिमबहुल भाग अंतिम रचनेत वगळला गेला. त्यामुळे आता या पदाधिकार्‍यासाठी हा प्रभाग अनुकूल झाला आहे, तर धनकवडी भागात अशाच पद्धतीने भाजपच्या एका ज्येष्ठ माजी माननीयाचा प्रभाग अंतिम रचनेत त्यांना हवा त्या पद्धतीने झाला. त्याचा फटका आता या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माजी ज्येष्ठ माननीयांना बसणार आहे. कोथरूडमध्ये अंतिम रचनेत मोठे बदल झाले, त्यात काही ठिकाणी अशाच पध्दतीने देवाणघेवाण झाली असल्याची चर्चा आहे.

शिवाजीनगर मतदारसंघातील औंधमधील जवळपास साडेचार हजार मतदार असलेल्या सोसायट्या बोपोडी-पुणे विद्यापीठ या प्रभागाला जोडल्या गेल्याने त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होणार आहे. तर, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मात्र ते आता अडचणीचे ठरणार आहे. अंतिम रचनेत एवढीच हरकत कशी स्वीकारली गेली, असा प्रश्न आता थेट महाविकास आघाडीमधील इच्छुकांनी उपस्थित केला असून, 'घर का भेदी लंका ढाये' अशीच अवस्था झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT