Manodhairya rehabilitation scheme
शिवाजी शिंदे
पुणे: बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार किंवा सिड हल्ल्यासारख्या अमानुष घटनांमुळे कोलमडून पडलेल्या महिला आणि बालकांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन आलेल्या शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेने हजारो पीडितांना जगण्याचे बळ दिले आहे.
केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी बनवणारी ही योजना पीडितांसाठी एक मोठा आधारस्तंभ ठरली आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील 6,353 पीडितांनी या योजनेच्या माध्यमातून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. (Latest Pune News)
समाजविघातक प्रवृत्तींकडून होणार्या अत्याचारांमुळे पीडित महिला आणि बालकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यांच्या मनावर झालेल्या आघातांमुळे त्या जीवन जगण्याची उमेदच गमावून बसतात. या कठीण परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने 2013 मध्ये ‘मनोधैर्य योजना’ सुरू केली.
काळानुसार या योजनेत बदल करून ती अधिक व्यापक करण्यात आली आहे. नवीन मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितांना किमान दहा लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाते. यासोबतच, त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यावर भर दिला जातो.
बालकांवरील अत्याचाराच्या घटना सर्वाधिक
गेल्या तीन वर्षांत पॉक्सोअंतर्गत तब्बल 4,836 प्रकरणे नोंदवली गेली असून, हा आकडा सर्वाधिक आहे. बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यातून ऐरणीवर आला आहे. बलात्काराच्या घटनांमध्येही वाढ दिसून येत असून, तीन वर्षांत 1,455 पीडितांना योजनेचा आधार घ्यावा लागला आहे.
वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान
एकीकडे ‘मनोधैर्य’ योजना पीडितांसाठी मोठा आधार ठरत असली तरी, दुसरीकडे वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान समाजासमोर आणि प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. या योजनेमुळे पीडितांना केवळ आर्थिक मदत मिळत नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याची नवी संधी मिळत आहे, हेच या योजनेचे सर्वात मोठे यश आहे.